Breaking News

केपीएल मॅच फिक्सिंगप्रकरणी आणखी दोन खेळाडूंना अटक

बंगळुरू : वृत्तसंस्था

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)दरम्यान पैसे घेऊन सामना निश्चिती (मॅच फिक्स) केल्याप्रकरणी कर्नाटकचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सी. एम. गौतम आणि माजी खेळाडू अबरार काझी यांना अटक करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये तीन मॅच खेळणारा, तसेच बेलारी टस्कर्स टीमचा कॅप्टन गौतम याच्यासह काझीला कर्नाटकच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. हे पथक गेल्या दोन सीझनमध्ये केपीएलमधील मॅच फिक्सिंगप्रकरणाची चौकशी करीत आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले की, आम्ही केपीएल फिक्सिंग प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. हुबळी विरुद्ध बेल्लारी फायनलमध्ये त्यांनी फिक्सिंग केल्याची माहिती मिळाली आहे. हुबळीने हा सामना आठ धावांनी जिंकला होता. धाव न करण्यासाठी त्याला 20 लाख दिले गेल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली. बंगळुरू टीमच्या विरोधात आणखी एक सामन्यात फिक्सिंग केल्याचा आरोपदेखील त्याच्यावर होत आहे. गौतम या सीजनमध्ये गोवा टीममध्ये, तर काजी मिजोरम रणजी टीममध्ये होता.

कर्नाटक आणि गोवाकडून रणजी खेळणार्‍या गौतमने आयपीएलमध्ये बंगळुरु, मुंबई आणि दिल्लीकडून सामने खेळले आहेत. गौतमने 94 प्रथम श्रेणी सामने खेळले. कर्नाटक संघाचा तो नियमित सदस्य होता. या वर्षी तो गोवा संघात दाखल झाला.

याआधी बंगळुरु टीमचा खेळाडू निशांत सिंह शेखावत याला अटक केली आहे. अटक केलेल्या तीन इतर व्यक्तींमध्ये बेळगाव पँथर्सचा मालक आहे. बंगळुरू ब्लास्टर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसाद आणि फलंदाज विश्वनाथन यांनादेखील अटक झाली आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply