Breaking News

भाविपचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पर्यावरणदिन कार्यक्रमात प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारत विकास परिषदेची पनवेल शाखा एकल वापर प्लॅस्टिकमुक्त अभियान राबवत असताना एक लाख कापडी पिशव्यांचे वितरण करत आहे ही अभिमानाची गोष्ट असून इतर सामाजिक संस्थांसाठी हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रशंसोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. भारत विकास परिषद आणि पनवेल मनपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक पर्यावरणदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, भाविप ही संस्था अनेक संस्कारक्षम आणि समाजोपयोगी कार्यक्रम अत्यंत आत्मियतेने राबवत आहे. तसेच येथील नागरिकही आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने पनवेल मनपा नवीन असूनही अनेक मानांकने मिळत आहेत. गणेश देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली पनवेलचा विकास होत असल्याचेही प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. भारत विकास परिषद आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला. येथील फडके नाट्यगृहामधे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनपा आयुक्त गणेश देशमुख, भाविपचे कोकण प्रांत अध्यक्ष महेश शर्मा आदी उपस्थित होते. पनवेल शाखेच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती समुद्र यांनी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक करताना भाविपच्या कार्याचा परिचय करून दिला. संस्थेचे प्रांत सेवा संयोजक गिरीश समुद्र यानी आपल्या मनोगतामधे प्लॅस्टिकमुक्त वसुंधरा ही संकल्पना स्पष्ट केली. बाळासाहेब पाटील आपल्या भाषणात म्हणाले, परिषदेने  प्लॅस्टिकमुक्तीचा  केवळ संदेश न देता कापडी पिशव्यांचा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला. यातून पर्यावरणरक्षणाबरोबरच आदिवासींना रोजगारही मिळवून दिला आहे. हे कार्य आदर्शवत असल्याचे बाळासाहेब पाटील म्हणाले. गणेश देशमुख आपल्या मनोगतामधे म्हणाले, जोपर्यंत जनाधार मिळत नाही तोपर्यंत कोणतीही शासकीय योजना यश्स्वी होत नाही. लोकांची मानसिकता निर्माण होऊन त्यांचा सहभाग मिळणे हा महत्वाचा भाग आहे. भाविप संस्थेच्या या कार्याची प्रशंसा करताना पनपा सदैव त्यांच्या कृतिशील उपक्रमांमधे  सदैव सोबत राहिल असे आश्वासन त्यानी दिले. भारत विकास परिषद आयोजित ’प्लॅस्टिकमुक्त वसुंधरा’ या उपक्रमांतर्गत एकलवापर प्लॅस्टिकमुक्त पनवेल या अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. प्लॅस्टिकच्या रीड्यूस, रीयुज आणि रीसायकलिंग या थ्रीआर या संकल्पनेसाठी मोलाचे योगदान देणार्‍या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध नाटककार शंकर आपटे लिखित व मोहन हिन्दुपूर दिग्दर्शित शपथ तुला आहे या पर्यावरणरक्षणाचा संदेश देणार्‍या लघुनाटिकेचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. डॉ. समिधा गांधी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पद्मनाथ भागवत यानी तंत्रसहाय्य केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply