Breaking News

भाताची शेती पाण्यात

भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही, त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकीकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही अनेक शेतकर्‍यांनी टिकवून ठेवली आहे, मात्र कर्जतसारख्या औद्योगिकीकरण न झालेल्या तालुक्यात आजही शेती हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे.

शेती हे कर्जत तालुक्यातील रोजगाराचे मुख्य साधन आहे. या भागात पावसाळी शेतीबरोबर उन्हाळी दुबार शेतीदेखील पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे असलेल्या भागात केली जाते, मात्र 10 हजारहून अधिक हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते, त्यात कर्जत तालुक्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात प्रयोगशील शेतकरी असून वेगवेगळ्या प्रकारची संकरित बियाणे आणून भाताची शेती करून भाताचे विक्रमी उत्पादन घेण्यावर कर्जत तालुक्यातील शेतकरी आघाडीवर राहिला आहे. शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणाहून अनेक प्रकारचे भातबियाणे खरेदी केले असून, चांगल्या प्रकारे रोपे तयार करून भात लावणी केली होती. नांगरणी करून भात लावणी करण्यावर देखील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात भर राहिला आहे. या वर्षी शेतकरी वर्गाने आपल्या शेतात रत्ना, जोरदार, वायएसआर, कोमल, सुप्रीम सोना, शुभांगी, कावेरी 21, सिरम, चिंटू, कर्जत 7, सह्यादी 4 असे विविध प्रकारचे भाताचे बियाणे लावून त्यातून चांगले उत्पादन घेण्याचे नियोजन केले होते. काही शेतकरी गादीवाफे, पेर भात, एसआरटी अशा प्रकारे भात लावणी करण्यात देखील शेतकरी आघाडीवर राहिले आहेत.

मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून बळीराजाच्या पाठीमागे लागलेले पावसाचे शुक्लकाष्ठ काही पाठ सोडायला तयार नसल्याचे दिसून आले आहे. 10-12 जूनला जमीन शिंपडून गेल्यानंतर शेतकर्‍यांनी लगबगीने भाताची रोपे तयार करण्यासाठी राब भरणी केली, पण मौसमी पावसाने आपली चमक दाखविण्याऐवजी या ठिकाणी काढता पाय घेतला आणि शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले.काही शेतकर्‍यांनी विहिरीतील पाणी वापरून भाताची रोपे जगविण्याचा प्रयत्न केला, मात्र 27 जूनला नकळत आलेल्या पावसाने तीन दिवस पाठ सोडली नाही आणि पूरस्थिती निर्माण केली. शेतीसाठी एकदम असा पाऊस काही फायद्याचा नसतो. त्यातही शेतकरी सावरणार असे वाटत असताना तिकडे भाताचे रोप तयार झाले, पण लावणी करण्याची वेळ आली तेव्हा जुलै महिन्यात पुन्हा एकदा विश्रांती घेतली. मग पुन्हा एकदा जूनच्या अखेरीस पावसाने केलेल्या बॅटिंगप्रमाणे जुलै महिन्यात हजेरी लावली आणि 27-29जून या तीन दिवसांत केलेल्या बॅटिंगची री ओढली अशीच स्थिती निर्माण झाली.शेतकर्‍यांनी त्याही स्थितीत भाताची रोपे यांची शेतात लावणी केली होती आणि त्यानंतर 15 दिवसांनंतर भाताचे पीक हातात चांगले यावे यासाठी ऊन वार्‍याचा खेळ अपेक्षित असतो, पण झाले उलटेच गणेशोत्सवच्या आधी भाताचे रोप हे भाताची पीक लोंबी बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्या वेळी खरेतर भाताच्या शेतीसाठी गारवा देणारा वारा हवा असतो, पण त्या काळात पावसाने सतत 15 दिवस झोड सुरू ठेवली होती, त्यामुळे भाताच्या लोंब्या वेळेवर बाहेर आल्याच नाहीत. परिणामी शेतकरी चिंतेत आला, पण नंतर बाहेर आलेल्या भाताच्या लोंब्या पूर्ण भरात बाहेर आल्याच नाहीत. मग दसर्‍यानंतर शेतकरी शेतात उभे असलेले भाताचे पीक कापणी करून साठवण करण्याची तयारी करतो, मात्र या वेळी दसर्‍याच्या आधी देखील पावसाने आपली ये-जा सुरूच ठेवली होती. त्याचा परिणाम भाताचे पीक शेतातून साठवण करण्यात अडचणी आल्या.त्याचा मोठा फटका असा होत होता की जी शेत ही माळरानावर आहेत, त्या शेतातील भाताचे पीक आधीच्या उन्हामुळे करपून गेले होते आणि नंतर त्या शेतात पेंढ्यासारखे करपलेले भाताची शेत दिसून येत होते.

खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्याचे काम ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने केले आहे. दसर्‍यानंतर शेतकरी भाताचे शेतात उभे असलेले पीक यांची कापणी करून ते पीक सुरक्षित ठिकाणी साठवण करून ठेवत असतो, पण तालुक्यातील अर्ध्या भागात भाताचे पीक शेतात कापून ठेवल्यावर पावसाने केलेली जोरदार सुरुवात यामुळे शेतात भाताच्या पिकाला मोड येऊ लागले आहेत. शेतात कापलेले भाताचे रोप हे 24 तास ऊन घेऊन कडक झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी नेण्याची तयारी शेतकरी करीत असतो, पण शेतकर्‍यांना शेतातून कापून ठेवलेले भाताचे पीक उन्हात कडक व्हायला वेळ मिळत नव्हता, अशा स्वरूपात पाऊस सुरू होता. त्यामुळे कर्जत तालुक्याच्या प्रत्येक भागात भाताचे पीक हे शेतात साचलेल्या पाण्यात भिजत आहे. त्यात माळरानावर कापून ठेवलेले पीक साठवण ठेवण्याची तयारी केली, पण पावसाची रिपरिप सुरूच असल्याने कुठेही साठवण करण्यात शेतकरी यशस्वी ठरले नाहीत.त्यामुळे कसेबसे हातात आलेले भाताचे पीक देखील बळीराजाच्या डोळ्यादेखत पावसात भिजत आहे. त्यामुळे ते भाताचे पीक हातातून गेल्यात जमा असून शेतात उभे असलेले भाताचे पीक हातात येऊन त्याची साठवण करून ठेवण्याची शेतकर्‍यांची तयारी देखील फुकट जाण्याची वेळ आहे. कारण कर्जत तालुक्यातील सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. या वादळी पावसाचा जोर मोठा असतो, सोबत वारा देखील असतो आणि त्यामुळे भाताचे पीक अलगद खाली जमिनीवर कोसळते. हा प्रकार सर्व भागात दिसून येत असून शेतात जे भाताचे पीक उभे आहे हे पूर्ण क्षमतेने तयार झालेले पीक आहे. त्यामुळे त्या भाताच्या दाण्याला पावसाचा जोरात फटका बसला की ते दाणे थेट जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे हाती किती पीक येईल हे सांगणे कठीण आहे, तर शेतात असलेल्या भाताच्या रोपाला कापणी करताना बसलेल्या धक्क्यात देखील ते भाताचे दाणे जमिनीवर कोसळू शकतात. त्यामुळे या वेळी शेतकर्‍यांच्या हातात काही दाणे मिळतील का? यात शंका आहे.

त्यामुळे आधी मोसमी पावसाने आणि आता सरत्या पावसाने शेतकर्‍यांच्या हातातून भाताचे रोप निसटण्याची चिन्हे आहे. तालुक्यात पावसाळ्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर, तर उन्हाळ्यात जेमतेम 3 हजार हेक्टर जमिनीवर दुबार शेती केली जाते. आता पीक हातातून गेलेल्या शेतकर्‍यांना भाताचे पीक घेण्यासाठी दुबार शेतीवर अवलंबून राहावे लागणार आहे, पण कर्जतपासून नेरळ, शेलूपर्यंत उन्हाळी शेती होत नाही. त्याच वेळी चिंचवलीपासून कडावपर्यंत मधल्या भागात देखील दुबार शेतीची शक्यता नाही, तर जिते-वाकसपासून वंजारपाडापर्यंत ते पुढे कशेळेपर्यंत आणि पूर्ण खांडस कळंब भागात देखील दुबार शेतीची सोय नाही. आता उरले राजनाला कालवा जेथे 2000 एकर जमिनीवर तसेच खांडपे, डोंगर पाडा, साळोख, अवसरे, पाषाणे या भागात तुरळक प्रमाणात भाताचे दुबार पीक घेतले जाते, मात्र नेरळपासून कळंब पर्यंत असलेल्या प्रत्येक शेतात भाताचे पीक पाण्यात कोसळून तर काही कापून ठेवलेले पाण्यात भिजत आहे. रेल्वेपट्ट्यात भाताची लावणी उशिरा होते आणि कापणी देखील उशिरा होते, मात्र त्या ठिकाणी वादळाने भाताची रोपे जमिनीवर कोसळली आहेत. हीच स्थिती दहिवलीपासून जांभिवली, वावलोली कडाव भागात असून तेथे भाताचे पीक शेतातच कोसळले आहे. त्यात शेतात पाणी असल्याने पुन्हा कोंब फुटण्याची वेळ आली आहे. कशेळेपासून वाकस, कशेळेपासून जामरूंग, कशेळेपासून खांडस, नांदगाव या भागात काही वेगळी स्थिती नाही. कळंब भागात शेकडो एकर जमिनीत भाताचे शेतात कापून ठेवलेले पीक भिजत असून अनेक ठिकाणी नवीन फुटवा येऊ लागला आहे, तर शेतकरी मजूर घेऊन कापणीच्या तयारीत असून प्रत्येक मजूर वेगवेगळ्या शेतकरी यांची कामे घेऊन असल्याने एकतर त्या मजुरांना घरी बसवून मजुरी द्यावी लागत आहे, तर काही ठिकाणी मजूर हातातून जाणार नाही म्हणून दोन वेळचे जेवण देऊन शेतकरी आर्थिक झळ सहन करताना दिसत आहे.

मात्र पावसाळ्यात सतत नुकसानी सहन करावी लागत असताना शासन काही उपाययोजना करताना दिसत नाहीत. नुकसानीचे पंचनामे होत नाहीत आणि शासनाचे प्रतिनिधी निवडणुकीच्या कामात रंगले आहेत. त्यामुळे बळीराजाची दिवाळी या वर्षीची पावसाने दुष्काळाची शक्यता आणणारी आहे. या वेळी भाताची शेती किती नुकसानीची आहे हे स्पष्ट होणार असून शेतकरी या वर्षी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे हे नक्की.

-संतोष पेरणे

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply