
सुधागड ः प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र समजला जाणारा ईद-ए-मिलादुन्नबी संपूर्ण देशासह सुधागड-पालीत रविवारी (दि. 10) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पालीत हिंदू-मुस्लिम बांधवांत सद्भावना आणि मैत्रीपूर्ण संबंध असून एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन गुण्यागोविंदाने सण साजरा करण्याची परंपरा कायम राखत ईद-ए-मिलादुन्नबी साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पाली-सुधागड येथील खालचा मुल्ला ते गांधी चौक मार्गे नूरानी जामा मशीद पाली मार्गे मिरवणूक काढण्यात आली. देशाची एकता, अखंडता, प्रगती व आतंकवादाच्या बिमोडाची दुवा पठण करत नार-ए-तकबीर अल्लाहू अकबर, एक नारा मोहम्मदी, नूरवाला हमारा नबी, या रसुलअल्लाह या रसुलअल्लाह…च्या धार्मिक घोषणा देत ‘जगा व जगू द्या,’ अहिंसा व मानवतेची शिकवण देणारे सत्यवादी पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांची जयंती जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त जुलूस-ए-मोहम्मदी काढण्यात आला. तत्पूर्वी मुस्लिम बांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी विशेष दुवा करीत देशावरील सर्व संकटे नष्ट होऊन विविधता, एकता व अखंडता कायम राहावी यासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी मुस्लिम बांधवांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. वयोवृद्धांपासून चिमुकले जुलूसमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जुलूसमध्ये मिठाईवाटप करण्यात आले. डोक्यावर इस्लामी टोपी परिधान करीत अनेक मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या वेळी नात-ए-पाकचे वाचन करण्यात आले. रविवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मशिदीत दुरुद व सलामचा नजराना पेश करीत पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांचे स्मरण करण्यात आले. नूरानी जामा मशीद येेथे पोहचल्यावर जुलूस विसर्जित झाला. येथे धर्मगुरूंनी पैगंबरांचे जीवनमान व धर्मकार्यावर प्रकाशझोत टाकत धर्माचे पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांच्या उपदेश व शिकवणींवर आचारण करत समाजात समानता व मानवतेचे पर्व नांदावे यासाठी समाजबांधवांनी पुढे यावे, असे आवाहन केले. या वेळी पावली येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.