Breaking News

एनएमएमटीच्या तोट्यात आणखी भर; चिंता वाढली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

अगोदरच तोट्यात सुरू असलेली नवी मंबई परिवहन उपक्रमाची बससेवा आणखी अडचणीत आली आहे. टाळेबंदीपूर्वी महिन्याला सहा कोटींपर्यंत सहन करीत असलेल्या तोट्यात आणखी दोन कोटींची भर पडली आहे. त्यामुळे उपक्रमाची चिंता वाढली आहे.एनएमएमटीची बससेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दिवसाला 384 बस विविध मार्गावर प्रवासी वाहतूक करीत आहेत. मात्र कोरोना संसर्गाची शक्यता असल्याने सामाजिक अंतरासाठी 50 टक्केच प्रवासी वाहतूक करता येत आहे. त्यात इंधन व वेतन खर्च कायम आहे, मात्र उत्पन्न कमी मिळत आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात एनएमएमटीची बससेवा ही अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जात होती. रुग्णालय, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानापासून कामाच्या ठिकाणी ही सेवा दिली जात होती. यात नवी मुंबई शहर तसेच ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, पनवेल, उरण, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, दहिसर, मोरी, खारघर, उलवे इत्यादी ठिकाणी दिवसाला सरासरी 10 हजार प्रवासी प्रवास करीत होते. त्यानंतर टाळेबंदी शिथिलीकरणानंतर सर्वसामान्य प्रवाशांनाही ही बससेवा काही अटी-शर्थीवर सुरू करण्यात आली. यात क्षमतेपेक्षा पन्नास टक्केच प्रवास वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी प्रतिदिन 40 लाख रुपये होणार्‍या उत्पन्नात घट होत ते 22 लाखांवर आले. त्यात इंधन खर्च, कर्मचारी वेतन कायम राहिल्याने हा तोटा वाढत आहे. टाळेबंदीपूर्वीही ही बस सेवा तोट्यातच सुरू होती. या वेळी महिन्याला उपक्रमाला सहा कोटी एवढा तोटा सहन करावा लागत होता. आता यात दोन कोटींची वाढ झाली. महिन्याला आठ कोटींचा तोटा परिवहन उपक्रमाला होत आहे. त्यामुळे उपक्रमाची चिंता वाढली आहे.

टाळेबंदीत 995 बसेस

कोरोना काळातही एनएमएमटीची बससेवा विविध कारणास्तव वापरण्यात आली. यात 18 बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले. तसेच राज्यातील स्थलांतरित 873 मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी 25 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच शहरातील 39 हजार 746 परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठीही एनएमएमटीने सेवा दिली. 5 मेपासून आजपर्यंत 995 बसेस या सेवेसाठी एनएमएमटीने उपलब्ध करून दिल्या असल्याचे समजते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply