

कर्जत ः बातमीदार
मोहंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त आणि ईद-ए-मिलादनिमित्त नेरळ गावात बोहरी समाजाच्या वतीने जुलूस मिरवणूक काढण्यात आली. रामजन्मभूमी बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली जुलूस मिरवणूक अत्यंत शांतपणे काढण्यात आली. नेरळमधील बोहरी समाजाने शनिवारी (दि. 9)ईद-ए-मिलाद साजरी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी बाबरी मशीदप्रकरणी होणार्या निर्णयामुळे रद्द करण्यात आलेली जुलूस मिरवणूक रविवारी (दि. 10) काढण्यात आली. या वेळी नेरळ सम्राटनगर भागात असलेल्या ताहेरी मशीद येथून बुर्हाणी पार्क येथील बँड पथक तसेच बोहरी समाजाचे प्रमुख जुजेरभाई नेरळवाला, ताहेरी मशीदचे प्रमुख शेख फकरुद्दीन ईदी, शेख अजनान नदीम हे अग्रभागी होते. बोहरी समाजातील प्रमुख एय्याजभाई पत्रावाला, हुसेनीभाई ब्रिटनिया, हुसेन माथेरानवाला यांच्यासह मुस्लिम समाजातील काही प्रमुखदेखील सहभागी झाले होते. नेरळ गावातील 400हून अधिक बोहरी समाजातील नागरिकांनी शिस्तबद्ध संचलन करीत नेरळ गावातून जुलूस मिरवणूक काढली. ताहेरी मशीद येथून निघालेली मिरवणूक नेरळ-माथेरान रस्त्याने जामा मशीद मार्गे जुन्या बाजारपेठेमधून पुन्हा माथेरान-नेरळ रस्त्याने सम्राटनगर येथील मशिदीत पोहचली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तणाव असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नेरळ पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जामा मशीद चौकात मोठा बंदोबस्त ठेवला होता.