अलिबाग : प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील 22 हजार 677 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. एक हजार 701 गावांतील 67 हजार 51 शेतकर्यांना याचा फटका बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
क्यार आणि महा या दोन चक्रीवादळांचा मोठा फटका रायगडातील भातशेतीला बसला. आठ हजार 872 हेक्टरवर कापणीपश्चात पिकांचे नुकसान झाले, तर 13 हजार 805 हेक्टरवरील शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. अलिबाग तालुक्यातील 55, पेणमधील 140, मुरूड 70, पनवेल 150, उरण 48, खालापूर 125, कर्जत 186, माणगाव 187, तळा 61, रोहा 163, सुधागड 100, महाड 183, म्हसळा 72, श्रीवर्धन 74 आणि पोलादपुरातील 87 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला.
रोहा, माणगाव, सुधागड, पोलादपूर, पेण, कर्जत व खालापूर तालुक्यांत भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने जिल्ह्यात 13 हजार 300 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले होते, तर ऑक्टोबर महिन्यात 22 हजार 677 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. म्हणजेच खरीप हंगामात एकूण 36 हजारांहून अधिक हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या 259 हेक्टर क्षेत्रावरील शेतीलाच विमाकवच आहे.