Breaking News

विराट कोहली चांगला लीडर, पण सर्वोत्तम कर्णधार नाही!

वॉर्नची गुगली

सिडनी : वृत्तसंस्था

भारतीय कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगभरात सर्वत्र पाहायला मिळतात. सामान्य माणसापासून ते दिग्गज क्रिकेटपटूपर्यंत सारेच त्याच्या खेळीची आणि त्याच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती करतात. यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने विराटच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती केली आहे, मात्र रणनीती आखण्याच्या बाबतीत विराटपेक्षा इतर दोन कर्णधार अधिक चांगले आणि सक्षम असल्याचे त्याने म्हटले आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा सदिच्छादूत म्हणून शेन वॉर्न याची निवड करण्यात आली. त्यानंतर जगातील सर्वोत्तम कर्णधार कोण, असे त्याला विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, विराट कोहली हा उत्तम खेळाडू आहे. आपल्या संघाला एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याचे नेतृत्वकौशल्य विराटकडे आहे, पण रणनीती आखण्याच्या बाबतीत मात्र न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन हे अधिक सक्षम आहेत.

धोनीच्या संघातील उपयुक्ततेबाबतही तो बोलला. ‘माझ्या मते धोनीला संघात जरूर स्थान देण्यात यायला हवे. सामन्याच्या परिस्थितीनुसार तो चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याला यष्टीरक्षक म्हणून संघात नक्कीच स्थान द्यायला हवे. त्याचा अनुभव हा संघास आवश्यक आहे’, असे वॉर्नने स्पष्ट केले.

भारताला जर विश्वचषक जिंकायचा असेल तर विराट, रोहित आणि धोनी यांची कामगिरी चमकदार होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या दोघांनाही सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे आहे, असे वॉर्न म्हणाला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply