मुरूड ः प्रतिनिधी
शनिवार-रविवारच्या सुटीचे औचित्य साधून पर्यटकांनी मोठी गर्दी काशिद व मुरूड समुद्रकिनारी केली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे येथील पर्यटन मोसम थंडावला होता, परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस नाहीसा होऊन स्वच्छ सूर्यप्रकाश पडू लागल्याने पर्यटकांनी पुन्हा समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. मुरूड व काशिद येथील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळत होत्या.
त्याचप्रमाणे ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरसुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.राजपुरी नवी जेट्टी व खोरा बंदर येथून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर नेले जात होते.पर्यटक आपल्या कुटुंबासह आले होते. डोक्याला ऊन लागू नये यासाठी टोप्या परिधान करून जंजिरा किल्ल्यावर जाणे त्यांनी पसंत केले.
समुद्रकिनारी समुद्र स्नान व त्याचप्रमाणे बनाना रायडिंगवर पर्यटकांनी अधिक भर दिला होता. काही पर्यटक घोडागाडीतून समुद्रकिनारी सैर करण्याची मजा लुटत होते. मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग बंद करण्यात आले आहे. कारण पुणे येथील पर्यटकाचा पॅरासेलिंगची दोरी तुटल्यामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून पॅरासेलिंगवर पोलीस प्रशासन व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाळूवर चालणार्या छोट्या चारचाकी गाड्यासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने फिरत असतात व वेगाने गाडी चालवल्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनासुद्धा या गाड्यांचा धोका असल्याने या गाड्यांची वाहतूकसुद्धा मुरुड समुद्रकिनार्यावरून बंद करण्यात आली. त्यामुळे येथे येणार्या पर्यटकांचे जीवन अधिक सुरक्षित झाले आहे. शनिवार-रविवारच्या मोसमात पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल व लॉजिंग व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून येत आहे. काशिद समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असून समुद्रकिनारी असलेल्या सर्व स्टॉलवर मोठी गर्दी दिसून येते. काशिद समुद्रकिनारी सुरुंच्या झाडाचे मोठे प्रमाण असल्याने पर्यटक या झाडांच्या सावलीत आपले भोजन येथेच बनवतात. तुफान गर्दीने काशिद किनारासुद्धा पर्यटकांनी फुलून गेला होता. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने स्थानिक लोकांचा धंदा वधारला आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रथमच पर्यटकांनी हजेरी लावल्याने हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. अवेळी पावसामुळे अलिबाग-मुरूड रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे पर्यटकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. मुंबई व पुणे येथील पर्यटकांनी सदरचा रस्ता चांगला बनवण्यात येऊन पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. पर्यटकांच्या या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष द्यावे व रस्ता सुस्थितीत बनवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.