Breaking News

आठ किलोचा गांजा जप्त

पनवेल : बातमीदार

उलवे व एनआरआय परिसरात गांजा या अमली पदार्थाची विक्री करणार्‍या माणिक जयराम रुडे (32) या व्यक्तीला परिमंडळ 1मधील अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने उलवे भागात सापळा रचून अटक केली. त्याची गाडी आणि घरामधून पोलिसांनी सात किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

अमली पदार्थ विरोधी विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांचे पथक नेरूळ परिसरात गस्त घालत असताना, त्यांना नेरूळ सेक्टर 3 मधील ममता माने उद्यानात इस्माईल सलिम राजपूरकर (20) व अब्बास इब्राहिम मोहम्मद शेख (33) हे दोघे अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आले. त्यांना अटक केल्यावर उलवे भागात राहणारा माणिक हा गांजा पुरवित असल्याचे त्यांनी सांगितले.

माणिक हा उलवे भागात गाडीमधून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने माणिक रुडे राहत असलेल्या घराजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता, त्याच्या गाडीमध्ये एका बॅगमध्ये दोन किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्येदेखील पाच किलो 900 ग्रॅम गांजा सापडला. त्यामुळे पोलिसांनी त्याला एनडीपीएस कलमाखाली अटक करून सात किलो 900 ग्रॅम गांजा व त्याची स्विफ्ट गाडी असा सुमारे पाच लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने त्याला येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. माणिक हा उलवेसह आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply