2007मध्ये मालगाडी वाहतूक सुरू झाल्यानंतर आजतागायत कर्जत-पनवेल मार्गावर उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी रेल्वेमंत्र्यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. या मार्गावर मालगाडी वाहतुकीनंतर काही गाड्या या मार्गाने चालविल्या जात आहेत. तर दुसर्या मार्गिकेसाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने होत आहे.
मधू दंडवते देशाचे रेल्वेमंत्री असताना पनवेलवरून कोकण रेल्वेचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री दंडवते यांनी कोकण रेल्वेबरोबर पनवेल-कर्जत या 29 किलोमीटर लांबीच्या मार्गाला मंजुरी देण्यात आली होती.29 किलोमीटर लांबीच्या या एकेरी मार्गावर तीन स्थानके बनविण्यात आली असून तीन बोगदे या मार्गावर आहेत.त्यातील कर्जतजवळील हालीवली हा बोगदा तब्बल 2900 मीटर लांबीचा असून हा बोगदा या मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्यात मोठा अडथळा ठरत आहे. 2007मध्ये या मार्गावर पहिल्यांदा मालवाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांनी नाशिक-पनवेल-कर्जत-पुणे ही एक्स्प्रेस गाडी सुरू झाली.परंतु आजपर्यंत एक दशक उलटून जाऊनदेखील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जात आहेत, मात्र 137 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या 29 किलोमीटर लांबीच्या मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी असूनदेखील रेल्वे प्रशासन त्याबाबत काहीही निर्णय घेत नाही.त्यामुळे पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग शापित आहे का, अशी भावना प्रवाशांची झाली असून कर्जत येथून नवी मुंबई आणि मुंबईत
नोकरीसाठी व शिक्षणासाठी जाणार्या सर्वांचे हाल होत आहेत.
दुसरीकडे सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी कर्जत-पनवेल रेल्वेमार्गावर दुहेरी मार्गिका टाकण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली होती, मात्र त्यावर तब्बल तीन वर्षांनीदेखील कोणत्याही प्रकारचे काम मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून झाले नाही. दुसरी मार्गिका टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारचे भूसंपादन मध्य रेल्वेच्या वतीने केले नाही. त्यामुळे या मार्गावर उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू होण्याची बाब दुरापास्त आहे. कारण या मार्गावर पहिली मार्गिका टाकण्यात आली, त्यावेळी मोरबे धरणाच्या खालील बाजूने खोदकाम करून मार्गिका टाकण्यात आली आणि त्यामुळे या मार्गावर चौकपासून कर्जत या भागात सतत पाणी असते तर पावसाळ्यात या संपूर्ण भागातील पाणी हे वाहून आल्याने कर्जत भागात महापूर स्थिती निर्माण झाली होती, मात्र त्यावेळी हालीवली येथे उभारण्यात आलेल्या बोगद्यात असलेल्या ठिसूळ दगडांमुळे अनेक वेळा अपघात घडले आहेत. असे असल्याने उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू करण्यात अडथळे येत आहेत.
मात्र उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी मेमू आणि शटल सेवेची मागणी अनेक वर्षे केली जात आहे, पण त्याकडे मध्य रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असताना या मार्गावर मनमाड-नाशिक-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे ही गाडी अनेक वर्षे दररोज चालविली जात आहे. त्याशिवाय मागील दोन वर्षांपासून मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसदेखील या मार्गावर नियमित धावत आहे. त्याचवेळी नांदेडला जाणारी हुजूरसाहेब आणि पुणे-कर्जत-पनवेल शटलदेखील नित्यनेमाने चालविली जात आहे, पण त्यांचा काही फायदा प्रवाशांना मिळत नाही. मध्य रेल्वे मेन लाईनवर सकाळ आणि सायंकाळची गर्दी कमी करण्यासाठी कर्जत-पनवेल मार्गावर उपनगरीय सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, पण उपनगरीय लोकल सेवेला हा मार्ग बनविला नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे किमान एक दशकापासून कर्जत-पनवेल मार्गावर लोकल सेवेची मागणी करणारे आता थकले आहेत. त्यावेळी किमान तासा दोन तासाने शटल किंवा मेमू गाडी सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात असते.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मागील दोन वर्षांपूर्वी निधी देण्याचे कबूल केले आहे, पण ज्या कामासाठी हा निधी देण्यात येणार आहे त्या दुसर्या मार्गिकेच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम पुढे जात नाही.त्यामुळे ते जलदगतीने व्हावे आणि एकेरी मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
पनवेल-कर्जत मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनकडून मेन लाईनवरील
आपत्तीच्या वेळी मुंबईकडे व पुण्याकडे जाणार्या गाड्या वळविल्या जातात. मग या मार्गावर किमान तासाच्या फरकाने शटल सेवा सुरू करण्यात काहीच अडचणी नाहीत. दुसरी मार्गिका होईल तेव्हा होईल, पण त्यासाठी उपनगरीय लोकल सेवेत रेल्वे बोर्डाने अडथळे निर्माण करू नयेत.उपनगरीय लोकल सेवेचा शुभारंभ आपल्याच कार्यकाळात होईल याबाबत आपण आशावादी आहोत.
-श्रीरंग बारणे, खासदार
पनवेल-कर्जत मार्गावर दुसरी मार्गिका टाकण्यासाठी नकाशा मंजूर असून कामही सुरू आहे. भूसंपादनाच्या शेतकर्यांना नोटिसा गेल्या असून हे काम वेळेचे बंधन घालून पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे धोरण आहे.
-ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
-संतोष पेरणे