Breaking News

कर्जतमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा कहर

तालुक्यातील 3000 घरांचे नुकसान

कर्जत : बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही फटका बसला आहे. या चक्री वादळासह मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. तालुक्यात साधारण 3000 घरांचे नुकसान झाले असून अगणित झाडे उन्मळून पडली आहेत.

तालुक्यातील मुख्य वीज वाहिन्या नेणारे 68 खांब कोसळले असून गावा गावातील 125 खांब यांचे नुकसान झाल्याने ते बदलावे लागणार आहेत. त्याचवेळी 12 गावातील वीज रोहित्र यांचे देखील वादळाने नुकसान झाले आहे. तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तुंगी या गावातील सर्व 70 घरांची छपरे उडून गेली आहेत, तर अन्य दोन गावातील 100 टक्के घरांचे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील 100 हुन अधिक घरे पूर्णपणे कोसळली असून 100 हुन अधिक जिल्हा परिषद शाळांची छपरे देखील उडून गेली आहेत. दरम्यान, खंडित झालेला वीज पुरवठा ग्रामीण भागात गुरुवारी (दि. 4) बंद होता, तसेच नेरळ आणि दस्तुरी नाका येथील वीज पुरवठा सुरू झाला.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वीज महावितरणने खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित केला होता. दुपारी कर्जत तालुक्यात सुरू झालेल्या या वादळाने कर्जत शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडणे, छप्पर उडून जाण्यासारखे प्रकार घडले आहेत. तर नेरळ शहरासह परिसरात घरावरील छप्पर उडून जाऊन संसार उघड्यावर पडल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातही घराच्या छप्पर, भिंती कोसळून पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी विद्यूत खांब व तारा तुटल्याने महावितरणचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली असून काही रस्ते हे झाडे रस्त्यावर कोसळल्याचे बंद झाले होते. त्यात नेरळ-माथेरान घाटरस्ता, नेरळ-कशेळे भीमाशंकर राज्यमार्ग रस्ता, कडाव-अंजप, मुरबाड राज्यमार्ग ते ओलमण आणि पुढे झुगरेवाडी, नांदगाव ते चई, कशेळे ते खांडस, कशेळे-कोथिंबे-मोग्रज, कशेळे-खांडस, नेरळ-मोहाचीवाडी हे रस्ते झाडे कोसळल्याने बंद झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावर कोसळलेली झाडे बाजूला करण्यात आली.

निसर्ग चक्री वादळाने झाडे कोसळताना ती विजेच्या खांबांवर कोसळली, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे, तो अद्याप सुरू झालेला नाही. तालुक्यात वीज पुरवठा करणारे मुख्य वीज वाहिनीची 68 खांब कोसळले असून ग्रामीण भागात गावागावात वीज पोहचवणारे 125 खांब हे देखील कोसळले आहेत. त्याचवेळी 12 गावातील वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र हे देखील कोसळले असून नवीन वीज रोहित्र पनवेल येथून तर आणि विजेचे खांब खोपोली येथून मागविण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता आनंद घुले यांनी दिली आहे. विजेचे खांब बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून खोपोली येथून आवश्यक नवीन विजेचे खांब आणण्यात आले आहेत.

कर्जत तालुक्यात प्रशासनाकडून पंचनामे करून घेतले जात आहेत. प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी पी. टी. रजपुत यांच्यासह महावितरणचे सर्व अभियंते हे गुरुवारी सकाळपासून फिल्डवर होते. तर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply