पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी, परसुले, पळचिल आणि पोलादपूर या ’प’च्या बाराखडीत पोलादपूर तालुक्याची आरोग्यव्यवस्था असून या चारही गावांतील आरोग्यव्यवस्थेचे बारा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी अथवा अधीक्षक पूर्ण वेळ पद देण्याची ग्वाही आरोग्य उपसंचालिका रावखंडे यांनी दिल्यानंतर आरोग्य उपसंचालिका श्रीमती राठोड यांनीही दिलेली ग्वाही हवेत विरली. पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांप्रमाणेच ग्रामीण रुग्णालयाचीही आरोग्य व्यवस्था आजारी असल्याची सद्यस्थिती दिसून येत आहे.
पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातून पळचिल येथे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये स्थलांतरीत झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्दैवाचे दशावतार अद्याप थांबले नसून नवीन इमारत बांधून स्लॅबमधून पाणी गळू लागत असल्याने ही इमारत अद्याप वापरात नाही.
शिवसेनेचे माजी ग्रामविकासमंत्री प्रभाकर मोरे हे 2002दरम्यान महाड विधानसभा मतदारसंघाचे विरोधी पक्षाचे आमदार असताना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पळचिल येथे स्थलांतरण होऊन रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीतील दोन खोल्यांमध्ये रुग्णसेवा सुरू झाली. यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत पळचिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजित इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आल्यानंतर रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी दि. 27 फेब्रुवारी 2009 रोजी या ठिकाणी भूमिपूजन केले. या वेळी भाषणामध्ये पावसाळा संपल्यानंतर ही वास्तू उभी राहिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत तटकरे यांनी दसरा-दिवाळी सणादरम्यान पालकमंत्री म्हणून आपणास उद्घाटनास बोलवावे, असे तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांना सुचविले होते, मात्र यानंतर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. सारेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात मग्न झाले. त्यानंतर पावसाळ्यातच विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आणि पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजित इमारतीबाबत कोणासही काळजी वाटेनाशी झाली. याचदरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत अॅम्ब्युलन्सही उपलब्ध करण्यात आली आणि तिचे लोकार्पण शिवसेनेच्या रायगड जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
16 डिसेंबर 2013 रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या कोकणातील पत्रकारांच्या कशेडी घाट रोको आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आवर्जून आलेले रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संचालक तथा रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष व विद्यमान आमदार सुभाष प्रभाकर उर्फ पंडितशेठ पाटील यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजित इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून हे काम अतिशय मंद गतीने सुरू असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली, मात्र त्यानंतर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण होऊन साधारणत: चार वर्षे उलटूनही दरवर्षी पावसाळ्यात या इमारतीच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपून भिंतीदेखील पाझरू लागल्याने या इमारतीचे उद्घाटन सुरू होऊ शकले नाही. वैद्यकीय अधिकारी तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुलाब सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रुग्णसेवा करीत असून प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यासह 11 कर्मचारी नियुक्त आहेत. या इमारतीच्या उद्घाटनपूर्व जीर्णोध्दारासाठी राजकीय इच्छाशक्तीवर भिस्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचे श्रेय घेण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष सरसावणार नसला तरी हा श्रेयवाद प्रचंड प्रमाणात उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर आरोग्य उपसंचालिका डॉ. रावखंडे यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी अथवा अधीक्षक पूर्णवेळ पद देण्यासोबतच ग्रामीण रुग्णालयातील सर्व समस्या दूर करण्याची ग्वाही दिली होती, मात्र प्रत्यक्षात तसे अद्याप घडले नसल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था अद्याप रुग्णावस्थेतच राहिली आहे. त्यामुळे प्रभारी पदातून महाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांची तात्पुरती सुटका झाली असून पोलादपूर तालुका वैद्यकीय अधिकारी यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी कारभार पाहावा लागत आहे. यानंतरच्या काळात पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेल्या डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी मनमानी कारभार करून स्टाफमधील कंपाऊंडरला 108 अॅम्ब्युलन्सवर डॉक्टर नियुक्त करून दुहेरी पगार खाण्याची संधी दिल्याचे उघड केल्यानंतर चौकशीला आलेल्या आरोग्य उपसंचालिका डॉ. राठोड यांनी अद्याप कोणताही बदल घडविण्याबाबत ठोस कार्यवाही केलेली दिसून येत नाही.
-शैलेश पालकर