ओल्या दुष्काळाने हवालदिल झालेले महाराष्ट्रातील शेतकरी आता पुढे कसे होणार या चिंतेत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांचे ओलिस आमदार पंचतारांकित हॉटेलांत बिर्याणीवर ताव मारत होते. याहून अधिक मोठा अपमान बळीराजाच्या वाट्याला कधी आला नसावा. एकटा भारतीय जनता पक्ष वगळता इतर सर्व पक्षांना सत्ता स्थापनेसाठी पंचतारांकित हॉटेलांमध्येच बैठका कराव्या लागतात हे नवलच.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी राजकीय उलथापालथ या आठवड्यात अवघ्या मराठी जनतेने पाहिली. स्वार्थांधळे राजकारण, कुटिल डावपेच, विश्वासघात अशा अनेक विखारी घटनांनी भरलेले हे तीन आठवडे मराठी जनतेचा अंत पाहणारे होते. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या संकटात भरडून-चिरडून गेलेला असताना, ज्यांना निवडून दिले त्या लोकप्रतिनिधींनी विधिनिषेध गुुंडाळून सत्तेसाठी जो गोंधळ घातला, तो उबगवाणाच होता. अत्यंत यशस्वी अशा पाच वर्षांच्या कारकीर्दीनंतर मतदारांनी आपला जनादेश देवेंद्र फडणवीस सरकारलाच स्पष्टपणे बहाल केला होता. परंतु सत्तेच्या खुर्चीसाठी विश्वासघात करीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना सामील होत महाराष्ट्राच्या विकासाच्या चक्रात खिळा घातला. यात भारतीय जनता पक्षाचा विश्वासघात आहेच, परंतु त्याहीपेक्षा अधिक जनादेशाची बेमुर्वत हेटाळणी अधिक आहे. किंबहुना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होऊ पाहणारे नवे सरकार हाच मुळी जनादेशाचा मूर्तिमंत अपमान आहे. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन विधिमंडळ पक्ष नेते अजितदादा पवार यांनी मिळून महाराष्ट्राच्या जनतेला एक स्थिर सरकार देण्याचा निकराचा प्रयत्न केला होता. परंतु तो अपयशी ठरला. यात अंतिमत: महाराष्ट्राचेच नुकसान आहे हे नजिकच्या भविष्यकाळातच लक्षात येईल. सत्तेसाठी राजकारण कुठल्या थराला नेले जाऊ शकते याचे असह्य चित्रण गेला आठवडाभर सर्व वृत्तवाहिन्यांवर ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली झळकत होते. या ब्रेकिंग न्यूजने मराठी मतदारांना निश्चितच निरुत्साही केले असेल. ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वातानुकूलित गाड्यांचे ताफे एका पंचतारांकित हॉटेलाकडून दुसर्या पंचतारांकित हॉटेलाकडे अहोरात्र धावत होते. ज्यांच्या जोरावर सरकार स्थापन करायचे ते आमदारांचे ‘संख्याबळ’ चक्क ओलिसांप्रमाणे बंदिस्त होते. इतकेच नव्हे तर, पोलिसठाण्यातील कच्च्या आरोपींप्रमाणे त्यांना ओळखपरेड देखील करावी लागली. भारतीय जनता पक्ष घोडेबाजार करून आमदारांची फोडाफोडी करेल अशा तथाकथित भीतीने विरोधी पक्षांच्या कडबोळ्याने हा पंचतारांकित उद्योग केला. परंतु भाजपने घोडेबाजार सोडा साधा संपर्क देखील केला नाही. आपल्याला कुणाचा फोन देखील आलेला नाही असे खुद्द श्री. उद्धव ठाकरे यांनी देखील मान्य केले होते. आम्ही घोडेबाजार केला नाही व करणारही नाही. परंतु विरोधकांनी मात्र मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात शिवसेनारूपी अख्खा घोड्यांचा तबेलाच पळवून नेला अशी मासलेवाईक टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे व ती टीका राज्यातील सत्तानाट्याचे यथार्थ चित्र उभे करते. कुठल्याही मार्गाने का होईना सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नव्या सरकारला शुभेच्छा देतानाच असेही सांगितले पाहिजे की 105 आमदारांच्या सक्षम फौजेनिशी रणांगणात उतरलेल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन हात करणे हा पोरखेळ नव्हे.