Breaking News

स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र

स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरावयाचे असेल, तर सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत सर्वांनीच सहभाग नोंदविला पाहिजे. या वर्षी आपण देशात तिसर्‍या क्रमांकावर आलो आहोत. आता मात्र नंबर 1 व्हायचे हा निश्चय केला पाहिजे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविले गेले. या स्वच्छता अभियानाचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने दोन वर्षांपासून स्वच्छता सर्वेक्षण अभियान सुरू केले आहे. या सर्वेक्षणात देशातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांचा समावेश असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपापल्या महानगरांमध्ये कशाप्रकारे स्वच्छता अभियान राबविले जाते याची जणू परीक्षाच केंद्राने घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये महाराष्ट्राने संपूर्ण देशात तिसरा क्रमांक पटकावित या वर्षीही स्पर्धेतील आपले सातत्य राखले आहे. देशातील स्वच्छतेच्या चळवळीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा मान मिळालेल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राने स्थान पटकावले आहे. सर्व राज्यांना मिळून देण्यात येणार्‍या 198 पुरस्कारांपैकी 46 एवढे लक्षणीय पुरस्कार महाराष्ट्राने प्राप्त केले असून पश्चिम विभागासाठी असणार्‍या 19 पुरस्कारांपैकी 13 पुरस्कारही राज्याच्या नावावर झाले आहेत, तसेच पश्चिम विभागातील आघाडीच्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 8 शहरांचा समावेश आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. देशातील 500 हागणदारीमुक्त शहरांच्या निवडीत राज्यातील 150 नागरी संस्थांचा समावेश झाला आहे. तसेच कचरामुक्तीसाठी स्टार रेटिंग मिळालेल्या शहरांमध्ये राज्यातील सुमारे 50 टक्के म्हणजे 27 नागरी संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे. अमृत योजनेंतर्गत निवडलेल्या 100 शहरांत 29, तर अमृत व्यतिरिक्त इतर घटकांमधील 100 शहरांमध्ये राज्यातील 60 शहरांनी स्थान पटकाविले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विभागांतर्गत 100 शहरांमध्ये राज्यातील 83 नागरी संस्थांचा समावेश आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील जनतेला आता स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले आहे. महाराष्ट्रात यापूर्वीच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राज्यातील गावागावात हे अभियान जोराने राबविले जात आहे. त्याचा पुढील भाग म्हणून विद्यमान सरकारने शहरी भागांसाठीही स्वच्छता

सर्वेक्षण अभियान सुरू केले आहे. या मोहिमेत राज्यातील बहुंताशी महानगर, शहर, निमशहरांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या निकषाप्रमाणे स्वच्छता सर्वेक्षण करून त्यात अनेक आमूलाग्र सुधारणाही केल्या जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात स्वच्छता राबविली जात आहे. शहरांचा चेहरामोहरा बदलला तर आश्चर्य वाटायला नको. आता या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकप्रतिनिधींबरोबरच नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होणे गरजेचे आहे. कारण कोणतीही मोहीम यशस्वी करायची असेल, तर नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे असते. त्यांच्या सहकार्याशिवाय कुठलीही मोहीम यशस्वी होत नाही. भविष्यात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवायचा आहे याचा निश्चय करूनच आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

Check Also

‘नैना’संदर्भात तातडीने बैठक घ्या

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरणाच्या …

Leave a Reply