Breaking News

घरच्या मैदानावर धोनीची शेवटची मॅच?

रांची : वृत्तसंस्था

भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर हा सामना होईल. रांची हे एमएस धोनीचं घरचं मैदान आहे. 37 वर्षांच्या धोनीनं या मैदानात एकूण 3 मॅच खेळल्या आहेत. शुक्रवारी धोनी इकडे चौथी मॅच खेळेल, पण धोनीची ही चौथी मॅच त्याच्या घरच्या मैदानातली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असू शकते. याच कारणामुळे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशननं धोनीच्या या शेवटच्या मॅचसाठी जोरदार तयारी केली आहे.

झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने रांचीच्या या मैदानात धोनीच्या नावाचं पॅव्हेलियन बनवलं आहे. आता या मॅचमध्ये धोनी फोर आणि सिक्सची बरसात करेल, अशी त्याच्या घरच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. एमएस धोनीनं त्याच्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 340 वनडे खेळल्या आहेत. यातल्या फक्त 3 मॅच धोनीला घरच्या मैदानात खेळता आल्या. जगभरात विस्फोटक खेळी करणार्‍या धोनीला घरच्या मैदानात मात्र आपली चमक दाखवता आली नाही. धोनीनं या मैदानात खेळलेल्या तीन मॅचपैकी एका मॅचमध्ये भारताचा विजय आणि दुसर्‍या मॅचमध्ये पराभव झाला. तर 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच रद्द करण्यात आली. 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणार्‍या धोनीनं चार वर्षांआधीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही संन्यास घेण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर रांचीमधली धोनीची ही शेवटची मॅच ठरेल. धोनीनं रांचीच्या या मैदानात फक्त 21 रन केल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी घरच्या मैदानात मोठी खेळी करण्याचा धोनीचा प्रयत्न असेल. धोनीच्या घरच्या मैदानात कर्णधार विराट कोहलीची बॅट तळपली आहे. कोहलीनं 4 मॅचच्या 3 इनिंगमध्ये 261 रन केले आहेत. कोहली या मैदानात सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. कोहली वगळता श्रीलंकेच्या एंजलो मॅथ्यूजला या मैदानात 100 पेक्षा जास्त रन करता आल्या आहेत. कोहली आणि मॅथ्यूज या दोघांनीच या मैदानावर शतक केलं आहे. दरम्यान, झारखंड क्रिकेट असोसिएशननं रांचीच्या स्टेडियममधल्या एका पॅव्हेलियनला धोनीचं नाव द्यायचा निर्णय घेतला आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशननं धोनीनंच या पॅव्हेलियनचं उद्घाटन करावं, अशी मागणी केली होती, पण धोनीनं ही मागणी फेटाळून लावली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव देबाशिष चक्रवर्ती म्हणाले, ‘मागच्या वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये नॉर्थ ब्लॉकचं नामकरण धोनीच्या नावावर करण्याचा निर्णय झाला. याचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही धोनीला आग्रह केला, पण धोनीनं याला नकार दिला. स्वतःच्याच घरात काय उद्घाटन करायचं? असं धोनीनं विनम्रतापूर्वक सांगितलं.’

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply