पनवेल ः प्रतिनिधी
महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीने निर्देशित केल्याप्रमाणे दुसर्या, तिसर्या तिमाहीतील गरोदर मातांचे बुधवारी (दि.16) महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर इन्फ्ल्यूएंझा लसीकरण करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, गावदेवी पनवेल येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
दुसर्या आणि तिसर्या तिमाहीतील गरोदर मातांसाठी हे लसीकरण असून विशेषकरून उच्च रक्तदाब तसेच मधुमेह असणार्या मातांनी ही लस घेणे आवश्यक असते. इंजेक्शनद्वारे द्यावयाची ही त्रिगुणी लस असून इन्फ्ल्यूएंझा विषाणू ‘ए’ प्रकारातील दोन उपजाती एच 1 एन 1 आणि एच 3 एन 2, इन्फ्ल्यूएंझा बी विषाणूविरोधात ही लस काम करते. ही लस घेतल्यानंतर गरोदर मातेच्या शरीरात इन्फ्ल्यूएंझाविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. या प्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती अधिकतम एक वर्षापर्यंत टिकून राहते. त्यामुळे हे लसीकरण महत्त्वाचे असते.
या वेळी महिला आणि बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेहाना मुजावर, तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व परिचारिका उपस्थित होत्या.