नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऋषभ पंतची यष्टींमागे होत असलेली सुमार कामगिरी आणि फलंदाजीतील अपयश पाहता निवड समितीने बांगलादेश दौर्यात संजू सॅमसनला संघात जागा दिली, मात्र एकही सामना न खेळवता निवड समितीने विंडीजविरुद्ध मालिकेत सॅमसनला वगळले. या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे निवड समितीने संजू सॅमसनला संघात स्थान दिले. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजू सॅमसनने आपण भारताकडून यष्टीरक्षक करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
केरळ संघाकडून खेळत असताना गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी यष्टीरक्षण करतोय. वन-डे आणि रणजी अशा दोन्ही स्पर्धांचा अनुभव मला आहे. संघाला जशी गरज आहे, तशी भूमिका निभावण्यासाठी मी तयार आहे. आयपीएलमध्येही ज्या वेळी संघाला माझी यष्टीरक्षक म्हणून गरज होती, त्या वेळी मी तसे केले. काही वेळा माझी संघाला क्षेत्ररक्षक म्हणून गरज होती, त्या वेळीदेखील काम केले. त्यामुळे मी कोणत्याही संघाकडून खेळताना मी दोन्ही भूमिकांसाठी तयार असतो आणि यापुढेही राहिन, असे आयएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना संजू म्हणाला.