सुधागड तालुका मराठा समाज संस्थेची मागणी
पाली : प्रतिनिधी
परतीच्या पावसाने हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 30) पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले.
सुधागड तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने शेतातील उभे पीक आडवे झाले, तर अनेक ठिकाणी कापलेल्या भातपिकाच्या दाण्यांना मोड आले. ओला दुष्काळ जाहीर करावा, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकर्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, असे सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संस्थेचे अध्यक्ष गणपतराव सितापराव, उपाध्यक्ष हनुमंत बेलोसे, सरचिटणीस जीवन साजेकर, शिरीष सकपाळ, अरविंद फणसे, रमेश लखिमले, मंगेश पालांडे, नंदुशेठ कुडपणे, शिवराम पवार, नथुराम वाघमारे, राजू कानडे, चंद्रकांत घायले, गोपाळ सावंत, सदू भोईर, राकेश साजेकर आदींनी बुधवारी पालीचे (सुधागड) तहसीलदार दिलीप रायन्नावार यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.