मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड शहरातील पेठ मोहल्ला मुस्लिम समाजाने विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी जमातून मुस्लमिन मोहल्ला पेठचे अध्यक्ष अल्ताफ मलिक, सचिव साबीर बुटे, माजी नगराध्यक्ष व अंजुमन हायस्कूलचे सचिव रहीम कबले, दिलावर महाडकर, उस्मान रोहेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
या वेळी या शिष्ठमंडळाने आमदार दळवी यांच्याकडे उसरोली येथील पंचक्रोशी हायस्कूलला दोन खोल्या आमदार निधीमधून बांधून मिळाव्यात, अशी मागणी केली, तर जमातुन मुस्लमिन मोहल्ला पेठ येथील कब्रस्थानला कंपाउंड वॉल व मातीचा भराव करून मिळण्यासाठी निधी प्राप्त करून द्यावा, अशी मागणी केली. याबाबत आमदार दळवी यांना निवेदनसुद्धा देण्यात आले.
आलेल्या शिष्ठमंडळला आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की, मुरूड शहरातील पेठ मोहल्ला येथील मुस्लिम समाजासाठी केलेल्या मागण्यांसंदर्भात नगरोत्थानमधून मोठा निधी लवकरच प्राप्त करून देणार आहे. समाजाने मागणी केल्याप्रमाणे लवकरच सर्व कामांसाठी निधीची पूर्तता करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मला कधी ही निधीची कमतरता भासू देणार नाही. त्यामुळे आगामी काळात मुरूड अलिबाग तालुक्यांसाठी मोठा निधी प्राप्त होऊन या भागाचा विकास झालेला पहावयास मिळणार आहे.