Breaking News

नवी मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग; एक लाख 60 हजार चाचण्यांचे लक्ष्य

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी येत्या काळात एक लाख 60 हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यास पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.

नवी मुंबईत बाधितांची संख्या 8072 झाली आहे, तर आजवर 260 जण मृत्युमुखी पडले आहेत. मुंबईप्रमाणेच चाचण्यांची गती वाढवून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर नवी मुंबई पालिकेने भर दिला आहे. यासाठी राज्य शासनाकडे एक लाख नागरिकांसाठी जलद चाचणीसाठीची मागणी केली आहे. याशिवाय खासगी कंपनीकडून पालिकेने चाचण्यांसाठी आवश्यक 60 हजार संच मागवले आहेत.

रुग्णाच्या संपर्कात येणार्‍या तसेच अतिजोखमीच्या संशयिताच्या चाचण्या तातडीने झाल्यास आणि चाचणी अहवालही मिळाल्यास संसर्ग रोखण्यासाठी मदत होते. यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे जलद चाचणी संचाची मागणी केली आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात चाचण्या सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून चाचणी संच मागविण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. संशयिताच्या एका बोटाच्या रक्ताचा नमुना घेऊन 15 ते 20 मिनिटांत अहवाल प्राप्त करण्याबद्दल पालिका प्रयत्नशील आहे. नवी मुंबईत आजवर फक्त दीड टक्का चाचण्या केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिका हद्दीतील चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय जलद चाचण्यांसाठी सरकारकडे एक लाख जलद चाचणी संचाची मागणी करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत चाचणीचे संच प्राप्त होतील.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply