Breaking News

पनवेल आरटीओचा बडगा

1735 चालकांवर कारवाई ; नियमांचे उल्लंघन केल्याने ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित

पनवेल : बातमीदार

सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या चालू वर्षात 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2019 या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1735 वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले. यात मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्‍यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांविरोधात पनवेल आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा धडाका सुरू असल्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

अशा वाहनचालकांवर प्रारंभी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. वाहनधारकांचे लायसन्स जप्त करून ते निलंबित करण्यासाठी आरटीओ विभागाकडे पाठविण्यात येते. यामध्ये लाल सिग्नल ओलांडून जाणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, सीटबेल्टचा वापर न करणे, विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे, दारू पिऊन, अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे, तसेच क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांचा समावेश असल्याची माहिती पनवेलचे आरटीओ लक्ष्मण दराडे

यांनी दिली.

राज्यात अपघातांची व त्यातील मृत आणि जखमींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीने रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार राज्य वाहतूक विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाला वाढत्या अपघातांना आळा घालण्यासंदर्भात सक्त सूचना दिल्या आहेत, तसेच वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे लायसन्स निलंबन करण्यासाठी ते आरटीओ विभागाकडे पाठविले जातात. त्यानंतर संबंधितांची सुनावणी घेऊन आरटीओ विभागाकडून लायसन्स परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाते.

नवी मुंबई वाहतूक शाखेने पनवेल आरटीओच्या हद्दीतील कारवाई केलेल्या वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव पनवेल आरटीओकडे पाठविले होते. त्यानुसार पनवेल आरटीओने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1735 वाहनचालकांचे लायसन्स निलंबित केले. यात सगळ्यात जास्त विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्‍या 837 वाहनचालकांचा समावेश आहे. त्या खालोखाल वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणार्‍या 486, लाल सिग्नल ओलांडून जाणार्‍या 326, दारू पिऊन, अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणार्‍या 72 आणि मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणार्‍या 14 वाहनचालकांवर बडगा उगारल्याची माहिती पनवेलचे आरटीओ लक्ष्मण दराडे यांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply