मुरूड : संजय करडे
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यावर काही ठिकाणी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुरूड तालुक्यातील बोर्ली-मांडल्याचाही समावेश होता, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि योग्य पाठपुराव्याअभावी गेली अडीच दशके बोर्ली-मांडला पोलीस ठाणे कागदावरच असून ते सुरू करणे ही काळाची गरज झाली आहे. मुंबईमध्ये 12 मार्च 1993 रोजी अतिरेक्यांनी 12 बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावाच्या समुद्रकिनारी उतरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्याच्या संरक्षणासाठी काही ठिकाणी सागरी पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मुरूड तालुक्यात एकूण 24 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 10 ग्रामपंचायतींचा समावेश रेवदंडा (अलिबाग) पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे, तर उर्वरित चौदा ग्रामपंचायतींचा समावेश मुरूड पोलीस ठाण्यात होतो. मुरूडच्या दक्षिणेकडील सावली, केळघरपासून उत्तरेकडील काशीद बीचपर्यंतची हद्दीचा त्यात समावेश असून, बारशिव खिंड रस्त्यापासून पारंगखार गावापर्यंतची हद्द रेवदंडा पोलीस ठाण्याकडे आहे. तालुक्यातील साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीसह बारशिव गावाजवळील खिंड रस्ता, उसरोली-सुपेगाव-खिंड रस्ता, नांदगाव बीच या ठिकाणी नेहमीच अपघात अथवा घातपात, चोरी, डाके दरोडे पडत असतात. येथे येणार्या पर्यटकांना नेमके कोणते पोलीस ठाणे गाठायचे हे कळत नाही. शिवाय दोन्ही पोलीस ठाण्यातून कर्मचारी येण्यासाठी किमान अर्धा तास तरी वाट पाहावी लागते. शनिवार, रविवार अथवा सुट्टीच्या दिवसात येथील समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी मुरूड पोलीस ठाण्याला बंदोबस्त ठेवावा लागतो. साळावच्या जेएसडब्ल्यू कंपनीत वाद, तंटेबखेडे किंवा दुर्घटना घडतात. अथवा येथील जंगली भागामुळे चोरट्यांना पळून जाण्यास वाव मिळतो. या सर्व गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी बोर्ली सागरी औटपोस्टची अत्यंत गरज आहे. 50-60 वर्षापूर्वी नबाब काळात तालुक्यातील मजगाव येथे एक पोलीस चौकी कार्यरत होती, मात्र कालांतराने ती बंद करण्यात आली. तेव्हापासून या भागाची जबाबदारीही मुरूड पोलीस ठाण्यावर पडली आहे.वाढती लोकसंख्या व बाहेरून येणार्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता सदर सागरी पोलीस चौकी पुनरुज्जीवित करणे क्रमप्राप्त ठरले आहे. मुरूड पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण असूनही कर्मचारी तुटपुंजे असल्याने सर्वत्र नजर ठेवणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शांतता कमिटीच्या सभेत लोकांच्या सूचना घेतल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी कधीच झालेली दिसत नाही. रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी त्याकडे लक्ष देऊन मुरूडला पुरेसे कर्मचारी द्यावे, तसेच बोर्ली-मांडला सागरी पोलीस ठाणे प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक जनता, व्यापारी व पत्रकारांकडून करण्यात येत आहे.