Breaking News

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांचे हाल, सर्व्हर सतत बंद असल्याने अनेक तास राहावे लागते रांगेत उभे

पनवेल  ः प्रतिनिधी

ट्रायमॅक्स कंपनीचा सर्व्हर सतत बंद पडत असल्याने एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांचे रांगेत उभे राहून हाल होत आहेत.

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार किमी मोफत प्रवासाची योजना जाहीर केली. त्यासाठी स्मार्ट कार्ड घेणे आवश्यक आहे. हे कार्ड घेण्यासाठी आगारात लांबच लांब रांगा लागत आहेत, पण त्यासाठी एजन्सी दिलेल्या कंपनीचा सर्व्हर सतत बंद पडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार किमी मोफत प्रवासाची योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड दाखवून 55 रुपये फी भरून महामंडळाच्या आगारातून स्मार्ट कार्ड घेणे आवश्यक आहे. यासाठी ट्रायमॅक्स कंपनीला एजन्सी देण्यात आली आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकच सर्व्हर असल्याने त्याच्यावर लोड आल्यावर तो स्लो चालतो किंवा बंद पडतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. अनेक वेळा सर्व्हर बंद पडल्याने पुन्हा यावे लागते.

एसटीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या सगळ्या विभागात आणि आगारात हीच स्थिती आहे. सिस्टीम बंद पडल्यास कंपनीचा माणूस वेळेवर येत नाही. सफाई कामगारापेक्षा कमी पगारावर कंपनीने नेमणूक केलेल्या कर्मचार्‍याला त्याबाबत पुरेसे ज्ञान नाही. त्यामुळे आगारातील अधिकार्‍यांना आपल्या हातातील कामे सोडून सतत कंपनीत फोन करण्यातच वेळ घालवावा लागत आहे. महामंडळ याबाबत कंपनीवर कोणतीही कारवाई करीत नसल्याने कंपनीचा बेजबाबदारपणा वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. 

मी चार दिवस सानपाड्याहून स्मार्ट कार्डसाठी पनवेल आगारात येत आहे, पण कधी सर्व्हर बंद, कधी कधी लाईन मिळत नाही, तर मंगळवारी लाइट नव्हती म्हणून माझे काम झाले नाही. बुधवारी सकाळी 9 वाजताच येऊन बसलो आहे.

– गणपत गवले, ज्येष्ठ नागरिक

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply