अलिबाग ः प्रतिनिधी
मुरूड व रोहा तालुक्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिक शेतकर्यांचा विरोध आहे. याची दाखल घेऊन या प्रस्तावित फार्मा पार्कचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडून मागवला आहे. प्रस्तावित फार्मा पार्कला परिसरातील भूमिपुत्रांचा विरोध आहे. याबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शेतकर्यांच्या प्रतिनिधी मंडळाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले होते. फार्मा पार्क प्रकल्प स्थानिक भूमिपुत्रांना, बागायतदारांना, मच्छीमारांना देशोधडीला लावणारा प्रकल्प आहे. लोकांच्या सुपीक जमिनी, गावठाण हद्दीतील घरे, शासकीय कार्यालये, मंदिरे, शाळा या संपादनात बाधित होत असून त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष खदखदत आहे. या प्रकल्पाविरोधात शेतकर्यांनी आंदोलने केली. या विभागात शासनाने आयोजिलेली जनसुनावणी भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी उधळून लावली. ही सर्व माहिती अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितली होती. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडून मागविला आहे.