अलिबाग : प्रतिनिधी
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 22 वर्षांच्या कालावधीत 200 कोटी रूपये ठेवींचा टप्पा पार केला आहे. यातील 100 कोटींच्या ठेवी मागील तीन वर्षांमध्ये जमा झाल्या आहेत. संस्थेचा एकत्रित व्यवसाय 343 कोटी 40 लाख रुपये असून नफा दोन कोटी 26 लाख इतका झाला आहे. आता वाटचाल रुपये 500 कोटी कडे होत असल्याची माहिती आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 1 ऑक्टोबर 1998 रोजी झाली. आजमितीस संस्थेच्या अलिबाग तालुक्यात 10 व मुरूड तालुक्यात एक अशा जिल्ह्यात एकूण 11 शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र रायगड, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे सहा जिल्ह्यांचे आहे. संस्थेने ऑक्टोबर 2017 मध्ये 100 कोटी रुपये ठेवींपर्यंत मजल मारली होती. फक्त तीन वर्षांमध्येच संस्थेने 100 कोटींच्या ठेवी जमा करून 200 कोटींचा पल्ला गाठला आहे. कोरोनामुळे टाळेबंदी व आर्थिकमंदी या सारख्या अडचणींवर मात करीत सभासदांच्या, ठेवींदारांच्या व हितचिंतकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आम्ही हा पल्ला गाठू शकलो, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.
31 डिसेंबर 2020 अखेर संस्थेच्या ठेवी 201 कोटी रुपये आहेत. 143 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 343 कोटी 40 लाख रुपये एकत्रित व्यवसाय झाला आहे. चालू वर्षात आतापर्यन्त संस्थेला दोन कोटी 26 लाख रूपयांचा नफा झाला आहे. संस्थेच्या या यशामध्ये सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सल्लागार नितीन वाणी, सर्व कर्मचारी वृंद व पिग्मी प्रतिनिधी यांचा मोलाचा वाटा आहे, असे संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.
संस्थेचा लेखापरिक्षण वर्ग ‘अ’ असून, एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. या वर्षी कोरोनासारख्या महामारीतदेखील संस्थेने सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप केला आहे. तसेच कोरोना काळात संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख 51 हजार रुपये तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली आहे.
संस्थेला सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाचा पहिला सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच संस्थेला आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त झालेले आहे. संस्थेने सन 2018 मध्ये अलिबाग शहरात मध्यवर्ती ठिकाणी स्वमालकीची मुख्य कार्यालयासाठी भव्य दिव्य वास्तू उभारली आहे. संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. संस्थेची आर्थिक परिस्थिती मजबूत असून सभासदांनी आपले व्यवहार आपल्या आदर्श पतसंस्थेत करून जास्तीत जास्त शेअर्स खरेदी करावेत, असे आवाहन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले आहे.