महाड : प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातील उपेक्षितांना त्यांचा न्याय हक्क प्राप्त करून दिला. या दिनाचे स्मरण म्हणून महाडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्मृतिदिनाकरिता भीमसैनिकांची महाडच्या क्रांतिस्तंभाला अभिवादन करण्याकरिता एकच गर्दी लोटली होती.
या कार्यक्रमाकरिता हजारो भीमसैनिकांनी हजेरी लावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिस्तंभाला अभिवादन केले. महाड तसेच राज्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी महाडमध्ये हजेरी लावली होती. हा दिवस महिला मुक्तीदिन म्हणूनही साजरा होत असल्याने महिलांनीदेखील गर्दी केली होती. विकास वंचित दलित महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत गेली अनेक वर्षे महाडमध्ये महिला मुक्तीदिनानिमित्त महिलांची रॅली काढून सभा घेताहेत. यावर्षीदेखील त्यांनी शहरातून मोठी रॅली काढली. यामुळे संपूर्ण महाड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष निनादला.
यानिमित्त महाडमध्ये विविध संघटनांचे कार्यक्रम झाले. शहरातील क्रांतिस्तंभ परिसरात हजारो भीमसैनिकांनी हजेरी लावून क्रांतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. बौद्धजन पंचायत समिती, प्रबुद्ध राष्ट्रीय संघ, त्रैलोक्य महासंघ यांच्यादेखील सभा या ठिकाणी घेण्यात आल्या. एसटी महामंडळाकडून वीर रेल्वे स्थानकामधून बसची सुविधा करण्यात आली होती.