Breaking News

प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे गेट बंद आंदोलन

रेवदंडा : प्रतिनिधी

जेएसडब्ल्यू कंपनीच्या साळाव युनिटमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना वगळून बाहेरील नोकरभरती केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्त साळाव व मिठेखार ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 5) कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करीत गेट बंद केले. सात तासांच्या आंदोलनानंतर कंपनी अधिकारी चर्चेस आले.

या आंदोलनात मिठेखारच्या सरपंच सुचिता चवरकर, साळावचे उपसरपंच दिनेश बापळेकर, रमेश गायकर, मोहन ठाकूर, धनजंय मुंबईकर, दत्ता पाटील यांच्यासह उपसरपंच, सदस्यही सहभागी झाले होते. आंदोलकांनी कंपनीचे गेट बंद करून अधिकारी व कर्मचार्‍यांना बाहेर येण्यास मज्जाव केला.

सायंकाळी 7 नंतर जेएसडब्ल्यू कंपनीचे डोलवी येथील जनरल मॅनेजर बळवंत जोग व पीआरओ कुमार थट्टे यांनी गेटसमोर आंदोलकांशी संवाद साधला. या वेळी आंदोलकांनी कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांची नोकरभरती न करता बाहेरीलभरती केल्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना येथील कंपनीच्या शाळेत मोफत शिक्षणाचे आश्वासन पूर्ण न करता भरमसाठ फी घेतली जात असल्याचे, तसेच कंपनीत चमचेगिरी करणारी काही मंडळी अधिकारीवर्गाला लाडीगोडी लावून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोपही करण्यात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply