पुणे : प्रतिनिधी
सीमेपलीकडील शत्रूंकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण असून, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण आणि छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते रविवारी (दि. 8) पुण्यात बोलत होते.
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) देशातील पोलीस महासंचालकांच्या सुरक्षा परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अरविंद कुमार, राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सुपर कम्प्युटर ‘परमब्रह्म’चे उद्घाटन या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते परमब्रह्म या सुपर कम्प्युटरचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच त्यांनी ’आयसर’च्या न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स या सुविधा प्रणालीला भेट देऊन अधिकारी आणि संशोधकांचे कौतुक केले, तसेच देशांतर्गत तंत्रज्ञान आणि परदेशी तंत्रज्ञानाचा मिलाफ करा आणि ऊर्जा क्षेत्रात भरीव संशोधन व कामगिरी करा, असे आवाहनही केले.