पाटणा : वृत्तसंस्था
प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्स संघाच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. पाटण्याच्या पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरू बुल्सने पाटणा पायरेट्सचा 47-26ने धुव्वा उडवला. तेलगूचा या स्पर्धेतीला हा पाचवा पराभव ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये त्यांनी केवळ एक सामन्यात बरोबरी साधली आहे.
बंगळुरू बुल्सने या सामन्यात अष्टपैलू खेळ करून दाखवला. पवन शेरावतने चढाई आणि पकडीत एकूण 17 गुणांची कमाई केली. त्याला चढाईमध्ये रोहित कुमार आणि बचावफळीत मेहंदर सिंहने 7 गुण मिळवत चांगली साथ दिली. तेलगू टायटन्सच्या बचावफळीला खिंडार पाडण्याचे काम पवन आणि रोहितने करून दाखविले.
तेलगूकडून या सामन्यातही सिद्धार्थ देसाईने एकाकी झुंज दिली, पण त्यालाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सिद्धार्थने सामन्यात 11 गुण मिळवले. त्याला विशाल भारद्वाजने 6 गुण मिळवत चांगली साथ दिली, मात्र इतर खेळाडू मोक्याच्या क्षणी आपला खेळ सुधारू शकले नाही. ज्याचा फायदा घेत बंगळुरूने सामन्यावर आपले पूर्णपणे वर्चस्व मिळवले. बंगळुरूचा प्रो-कबड्डीच्या इतिहासातील हा दुसरा मोठा विजय ठरला आहे.