Breaking News

मुलांच्या चेहर्यावरील आनंद बघण्यासारखा होता -वैभवी घांग्रेकर ‘सेंट जोसेफ’च्या विद्यार्थ्यांनी दिली करंबेली आदिवासी पाड्याला भेट

पनवेल ः प्रतिनिधी

आपल्या हातात बिस्किटाचा पुडा मिळाल्यावर त्या छोट्या मुलांच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद बघण्यासारखा होता. आपल्या मोठ्या भावाने किंवा ताईने अख्खा बिस्किटचा पुडा आपल्याला दिल्याचे अप्रूप त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पनवेल तालुक्यातील करंबेली आदिवासी पाड्यावर भेट दिली. त्याचे वर्णन शिक्षिका वैभवी घांग्रेकर यांनी अशा प्रकारे केले.

नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा दल प्रकल्पांतर्गत नेरेजवळील करंबेली आदिवासी पाड्यावर भेट दिली. या मुलांनी आपल्या पालकांकडून गोळा केलेल्या वस्तूंचे वाटप येथे केले. या वेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला या मुलांनी भेट देऊन मुलांना आपल्यातर्फे खाऊ म्हणून बिस्किटाचे पुडे वाटले. याशिवाय मुलांना कपडे आणि महिलांना साड्या व प्रथमोपचाराची पेटी देण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. ए. एफ.पिंटो आणि संचालिका ग्रेस पिंटो यांच्या ध्येयानुसार सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा उपक्रम  राबविण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका फरझाना तुंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका वैभवी घांग्रेकर आणि शिल्पा उभारे यांनी समाजसेवक नामदेव दिघे, रोटरीयन उमेश लाड यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी केला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply