संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे उपक्रम
पनवेल : प्रतिनिधी
संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे मंगळागौरीतून पर्यावरण जागर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला. नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 60 सख्यांनी या मध्ये सहभाग घेतला या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेचे अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली थोरात विजेते ठरले.
श्रावण आणि मंगळागौर याचे अतूट नाते आहे आणि अश्या ह्या मंगळागौरीचे आयोजन गेले 12 वर्ष संवेदना चॅरिटेबल संस्था करत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मंगळवारी (दि. 9) पनवेल येथील सुरुचि हॉलमध्ये इंद्रधनू रंगानी रंगलेला मंगळागौरीचा कार्यक्रम पनवेल नगरीत झाला. पनवेलसोबतच नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सख्यांनी नऊवारी साज लेवून उत्साहाने भाग घेतला.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेत अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली धोरात यांना बक्षिसे देण्यात आली. मंगळागौर हे महिलांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातील मनाला प्रफूल्लीत करणारा बुस्टर डोस आहे, कारण आलेल्या सख्या येथून जाताना आनंदाचा ठेवा घेऊनच जातात आणि हाच ठेवा बरेच दिवस प्रत्येकीच्या रोमारोमात भिनलेला असतो, असे मत या वेळी संस्थेच्या आध्यक्षा सुनेत्रा गवाणकर यांनी व्यक्त केले.
या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर, उपआध्यक्ष प्रज्ञा गावडे, खजिनदार आरती दामले, नंदा घोडींदे, ज्योती मोघे, अरुणा बने संस्थेतील इतर सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.