पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील 20 महिलांचे मुद्रा लोनसाठीचे प्रस्ताव मंजूर झाले असून, लवकरच त्यांना मुद्रा लोनची रक्कम मिळेल, अशी माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. पनवेल महापालिका हद्दीतील महिलांचे महापालिकेतर्फे मुद्रा लोनसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले होते. सोमवारी (दि. 18) मुद्रा लोनच्या महाराष्ट्राच्या प्रमुख वर्षा भोसले आणि ठाणे विभाग भाजप उपाध्यक्ष उत्तम रावल यांनी पनवेल महापालिका कार्यालयात येऊन आलेल्या प्रस्तावांची पडताळणी केली आणि पहिल्या टप्प्यात कागदपत्रे पूर्ण असणार्या 20 प्रस्तावांची मुद्रा लोनसाठी निवड केली. पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची वर्षा भोसले आणि उत्तम रावल यांनी भेट घेऊन त्यांना माहिती दिली. उर्वरित प्रस्तावांचे कागपत्र पूर्ण केल्यावर त्यांना मंजुरी देण्यात येईल, असे भोसले यांनी सांगितले. महापौरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी महिला व बालकल्याण सभापती लीना गरड उपस्थित होत्या.