Breaking News

हे तर चालायचेच

कित्येकदा आग लागलेल्या ठिकाणी असलेल्या संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना संबंधितांना असतेही. वापरकर्त्या सर्वसामान्यांकडून तक्रारीही केल्या जातात. परंतु हालचाल काहीच होत नाही. अखेर कित्येकांचा बळी गेल्यानंतरही त्याची जबाबदारी म्हणून कुणाला शिक्षा झाल्याचे नजीकच्या भविष्यकाळात तरी दिसत नाही. मग जबाबदारीने सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष तरी कुणी का देईल? उत्तर दिल्लीतील धान्य बाजार भागातील अनाज मंडी या चार मजली इमारतीत रविवारी सकाळी लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे नेहमीचेच कारण पुढे आले असून इमारतीत अनेक बेकायदा कारखाने होते हेही सर्वज्ञात आहे. आगीत बळी पडलेले सारे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजूर आहेत. इमारतीतील एकेका खोलीत 10 ते 15 कामगार होते. बहुतेकांचा झोपेत तर काही जणांचा जिवाच्या आकांताने कुठे कानाकोपर्‍यात आसरा घेतलेल्या अवस्थेत गुदमरून मृत्यू झाला. आगीनंतर चौकशी व नुकसानभरपाई जाहीर करण्याचे नेहमीचेच सोपस्कार पार पडले आहेत. परंतु इतक्या मोठ्या संख्येने आगीत बळी गेल्यानंतरही तिथे दिल्लीत वा कुठेही काहीच बदलणार नाही. आग नेमकी कशामुळे लागली याविषयी प्रचंड गदारोळ आणि अनेक दिवस काथ्याकूटही चालणार नाही कारण ज्यांच्या जिवाचे मोल कुणाच्याही लेखी कवडीइतकेही नाही अशा गोरगरीब मजुरांच्या कामाची ठिकाणे ही अशीच असतात. तिथे कुठली आली आहे आगीपासून बचाव करण्याची अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना आणि काय? दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींमधून कशीबशी वाट काढत आणि खिडक्यांच्या जाळ्या कापून अग्निशमन दलाच्या जवानांनी कसाबसा आत प्रवेश मिळवला आणि होरपळलेल्या, गुदमरलेल्या आणि तरीही किंचितशी धुगधुगी शिल्लक असलेल्या काही जणांचे प्राण वाचवले. सगळीकडचेच अग्निशमन दलाचे जवान आपल्या जिवाची पर्वा न करता बचावकार्य करतात एवढीच काय ती जमेची बाजू दरखेपेला अशा घटनांमधून समोर येते. बाकी सारी कमालीची बेपर्वाई हेच निर्विवाद वास्तव. नगरयोजना, वीजपुरवठा आदींबाबत दक्षता, वापर कशासाठी केला जाणार हे लक्षात घेऊन केली गेलेली सुरक्षा उपाययोजना या सार्‍या गोष्टी आपल्याकडे उच्चभू्र भागात वा इमारतींमध्ये देखील असतील असे छातीठोकपणे सांगता येत नाही. देशांतील सर्व महानगरांमध्ये अशा गलथान कारभाराचे व अक्षम्य हेळसांडीचे बळी अधूनमधून जात असतात. दुर्घटना घडली की बळींच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई जाहीर होते. इमारतीच्या वा संबंधित हॉटेल वा कार्यालयाच्या मालकाला अटक होते. पुढे ‘तारीख पे तारीख’ या न्यायाने प्रकरण धीम्या गतीने पुढे सरकत राहते. या गलथानपणाची जबाबदारी कुणा एकावर टाकणार तरी कशी? सगळी व्यवस्थाच त्यासाठी जबाबदार असताना मग होतात ते निव्वळ तात्कालिक आरोप-प्रत्यारोप. दुय्यम दर्जाचे काम करून इमारती उठवायच्या, गरजूंनी आयुष्यभराची कमाई खर्ची करून तिथे गाळे विकत घ्यायचे वा चाकरमान्यांनी सुरक्षा व्यवस्था आदींचा कुठलाही विचार न करता मिळेल त्या ठिकाणी काम करायचे. अनेकदा मौजमजेच्या ठिकाणी पोराबाळांसह जाताना, तिथे गर्दी असली तरी कुणीही आपत्कालीन मार्ग कुठे आहे याची चौकशीही करीत नाही. जिथे सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा रिवाजच नाही, तिथे या अशा घटना अधूनमधून घडत राहणारच. तेव्हा हे तर चालायचेच.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply