लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील गव्हाण येथे शनिवारी (दि. 3) जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दिव्यांगांसाठी सतत खंबीरपणे उभे राहणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना स्वतःमध्ये कमतरता वाटू नये याकरिता त्यांना दिव्यांग हा शब्द दिला. त्याचप्रमाणे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनेदेखील दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपले हक्क मिळावे यासाठी आपण सर्व जण मिळून काम करूया.
गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक जे. एम. म्हात्रे, उपसरपंच विजय घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक हाडकू कोळी, अध्यक्ष अशोक कोळी, प्रमोद कोळी, अशोक कडू, जनार्दन कोळी, स्मार्टकेअर डायग्नोस्टिक सेंटरच्या डॉ. दीपाली गोडघाटे, सागर रंधवे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, स्मार्टकेअर डायग्नोस्टिक सेंटरतर्फे दिव्यांग बांधवांसाठी विनामूल्य घरपोच सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये रक्तचाचणी, एक्स-रे आणि ईसीजी माफक दरात करून देण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.