Breaking News

माथेरानचे पर्यटन बहरणार

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्वांना लाल मातीच्या रस्त्यांनी हिवाळ्यात गुलाबी थंडीचा, तर उन्हाळ्यात थंडगार हवेचा आणि पावसाळ्यात धुक्याची चादर अनुभवण्यास मिळते. या शहरातील रस्ते आता कात टाकत आहेत. दरम्यान, माथेरान शहरात प्रवेश करणारा एकमेव रस्ता असलेल्या महात्मा गांधी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली असून चार किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी 36 कोटींचा निधी एमएमआरडीएने दिला असून हा रस्ता दगडी पेव्हर ब्लॉक लावून बनविला गेल्याने धूळविरहित बनणार आहे.

माथेरान या सह्याद्रीच्या डोंगरात वसलेल्या गावात वाहने जात नाहीत. जगाच्या पाठीवर असे एकमेव लोकवस्तीचे ठिकाण आहे की जिथे वाहनांतून प्रवास करण्यास आणि वाहनांना बंदी आहे. ब्रिटिशांनी लागू केलेला नियम आजही पाळला जात असून सरकारी यंत्रणेच्या नियंत्रणात असलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात, मात्र या ठिकाणी वाहनेच नसल्याने रस्तेदेखील लाल मातीचे असून त्या लाल मातीच्या रस्त्यावरील माती आणि दगड हे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जातात.त्यामुळे त्या ठिकाणी असलेले रस्तेदेखील सुस्थितीत नाहीत. ही बाब पर्यटन केंद्रावरील पर्यटन वाढविण्यात अडचणीची ठरत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे माथेरान गिरीस्थान नगरपालिकेत लोकशाही मार्गाने निवडून गेलेले सदस्य रस्त्याच्या सुधारणेसाठी सातत्याने मागणी करीत असतात.

शासनाच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या माथेरानच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठा निधी दिला आहे. त्या निधीमधून माथेरान शहरात प्रवेश करण्यासाठी अस्तिवात असलेला एकमेव रस्ता म्हणजे महात्मा गांधी रोड नव्याने बांधला जात आहे. वाहने ज्या ठिकाणी पार्किंग करून ठेवली जातात, तेथून रेल्वेची शटल सेवा नसेल तर घोडे अथवा पायी चालत माथेरान शहरात जावे लागते. हा प्रवास कोणालाही चुकला नसून सर्वांना ज्या महात्मा गांधी रस्त्याने दस्तुरी नाका येथील टॅक्सी स्टॅण्ड येथून जावे लागते, त्या रस्त्याची अवस्था लक्षात घेऊन त्याची निर्मिती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. 2017मध्ये खरंतर या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी निधी मंजूर होता, मात्र माथेरानमधील इको सेन्सेटिव्ह झोन यांचे निर्बंध आणि अटी पार करताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दमछाक झाली होती.

मात्र दस्तुरी नाका ते शिवाजी महाराज चौक या महात्मा गांधी रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे काम आता सुरू झाले आहे. या रस्त्यावर आता दगडी पेव्हर लावले जाणार असून त्यामुळे धूळविरहित रस्त्याचे स्वप्न साकार होणार आहे. चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी क्ले पेव्हर वापरले जाणार असून त्यावरून घोड्यांनी वाहतूक केली तर त्यांचे पाय सरकणार नाहीत आणि घोड्यांना अपघात होणार नाहीत. या रस्त्यात रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारे असणार असून रस्त्याच्या कडेला एकसंगतीचे विजेचे दिवे, वाटसरूंना बसण्यासाठी बाकडे, जागा उपलब्ध असेल, तर आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे, मात्र बाजारपेठ भागात आणखी काही वेगळे करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. या रस्त्यावर दगडी पेव्हर लावले जाणार असून घोड्यांना चालण्यासाठी मधोमध लाल मातीचा रस्तादेखील असणार आहे.

या महात्मा गांधी रस्त्यावर अमन लॉज स्टेशनजवळ असलेला खोलगट भाग हा हातरिक्षा, मालवाहू हातगाड्या आणि घोडेवाले यांच्यासाठी परीक्षा बघणारा भाग आहे. तेथे खोलगट भाग आणि नंतर तीव्र चढाव अशी स्थिती असलेल्या रस्त्यावर होणारी दमछाक ही एमएमआरडीएकडून नव्या पद्धतीने बांधणी केलेल्या रस्त्यामुळे कमी होणार आहे. ही स्थिती लक्षात घेऊन 36 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याबद्दल प्रचंड उत्सुकता माथेरानकरांमध्ये निर्माण झाली आहे. त्याच वेळी हा रस्ता माथेरानच्या पर्यटनवाढीमधील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे विविध

प्रकारच्या परवानग्या नसल्याने राखडलेल्या रस्त्याचे काम सुरू होत असल्याने पर्यटनवाढीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

-संतोष पेरणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply