Tuesday , February 7 2023

सिडकोच्या भूखंडांना पुन्हा विक्रमी दर

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे खारघर व नवीन पनवेल (प.) येथील पाच भूखंडांच्या विक्री करण्याच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. सदर विक्रीतून सिडको महामंडळाच्या तिजोरीत अंदाजे 157 कोटी रुपयांची भर पडली आहे. योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार 10 डिसेंबर रोजी सिडको भवन येथे संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडली. प्राप्त झालेल्या ई-निविदा निविदाकारांसमोर ऑनलाईन माध्यमातून उघडण्यात आल्या व ई-लिलाव प्रक्रियेमधील बोलींची तुलना करण्यात येऊन यशस्वी निविदाकारांची नावे जाहीर करण्यात आली. खारघर येथील भूखंड क्र. 2करीता रु. 73635 प्रति चौ.मी. इतका आधारभूत दर निश्चित करण्यात आला होता. नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्र. 6 आणि 22ए करीता रु. 63332 प्रति चौ.मी., तर भूखंड क्र. 9 आणि 21 करीता रु. 51,604 प्रति चौ.मी. इतका आधारभूत दर निश्चित करण्यात आला होता. बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा ई-लिलावामध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली यापैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्चित करण्यात आला होता. या निकषानुसार सदर सर्व भूखंडांकरिता ई-लिलाव प्रक्रियेमध्ये उद्धृत करण्यात आलेली सर्वाधिक रकमेची बोली स्वीकारण्यात येऊन संबंधित अर्जदारांना यशस्वी म्हणून घोषित करण्यात आले. भूखंडांच्या आधारभूत दरांपेक्षा या बोली सरासरी दुपटीने अधिक आहेत. खारघर येथील भूखंड क्र. 2 करीता मे. अरहम डेव्हलपर्स यांच्यातर्फे उद्धृत करण्यात आलेली रु. 2,06,635 प्रति चौ.मी. ही महत्तम बोली ठरली. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्या. यामध्ये ऑनलाईन बंद निविदा सादर करणे निविदाकारांना अनिवार्य होते. बंद निविदा सादर करणार्‍या निविदाकारांनाच पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते. सदर योजनेंतर्गत खारघर येथील सेक्टर-12मधील भूखंड क्र. 2, नवीन पनवेल (प.) येथील सेक्टर-17मधील भूखंड क्र. 6, 9, 21 आणि 22ए हे भूखंड भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर सर्व भूखंड हे वाणिज्यिक व निवासी वापराकरिता उपलब्ध होते. खारघर येथील भूखंड क्र. 2चे क्षेत्रफळ 2731.96 चौ.मी., नवीन पनवेल येथील भूखंड क्र. 6चे क्षेत्रफळ 2271.45, भूखंड क्र. 9चे क्षेत्रफळ 2743.42 चौ.मी., भूखंड क्र. 21चे क्षेत्रफळ 1576.26 चौ.मी. आणि भूखंड क्र. 22ए चे क्षेत्रफळ 1543.57 इतके होते. सदर सर्व भूखंडांकरिता 1.5 इतका चटई क्षेत्र निर्देशांक लागू होता.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply