Breaking News

नेरळमध्ये विद्यार्थ्याचे हाताचे बोट तुटले

शाळेकडून पालकांना कोणतीही माहिती नाही

कर्जत : बातमीदार

कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील नेरळ पेट्रोलपंप येथे हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूल असून, तेथे सहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या हाताचे बोट शाळेतच तुटले आहे, मात्र त्याबाबत शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्याच्या पालकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पालकांनी या विद्यार्थ्याला खासगी डॉक्टरकडे नेल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. नेरळमधील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये   विराज ठक्कर (12) हा सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील किरीट ठक्कर हे ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतात, तर आई दिव्या ठक्कर या गृहिणी आहेत. 6 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विराज वर्गखोलीच्या दरवाजात उभा असताना अचानक दरवाजा बंद झाला. त्यात विराजच्या डाव्या हाताच्या करंगळीचा तुकडा पडला. दरवाजाला रोधक (स्टॉपर) नसल्याने ही घटना घडली, मात्र त्याची माहिती पालकांना न देता शाळेने विराजला डॉ. महेश शिरसाट यांच्या दवाखान्यात नेले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर शिक्षकांनी विराजला त्याच्या घरी गेले व फक्त नख तुटले आहे, असे त्याच्या आईला  सांगितले, मात्र मुलाच्या बोटातून सतत रक्त येत असल्याचे पाहून विराजच्या आईने त्याला डॉ. राठोड यांच्याकडे नेले. तेथे बोटाची पट्टी सोडली असता विराजच्या बोटाचा तुकडा पडला असल्याचा प्रकार उघडकीस आला. डॉ. राठोड यांनी विराजची जखम पाहून त्याला तत्काळ पुढे हलवण्याचा सल्ला दिला. विराजच्या वडिलांना बोलावून घेऊन ठक्कर दाम्पत्याने ठाणे येथील नोबेल हॉस्पिटल गाठले. तेथे विराजच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देतो, मात्र वर्गखोलीच्या दरवाजाच्या रोधक (स्टॉपर) खालील फरशी निखळल्यामुळे  दरवाजा जोरात लागला गेला. त्यात विराजच्या बोटाचे नख निघाले असेल म्हणून आम्ही प्रथमोपचार करून त्याला घरी सोडले. त्यात आमची काही चूक नाही.

-मिलिंद गायकवाड, मुख्याध्यापक, हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूल, नेरळ

हाजी लियाकत शाळेतील शिक्षक विराज या विद्यार्थ्याला घेऊन दुपारी बाराच्या सुमारास माझ्या दवाखान्यात आले होते. त्याच्या करंगळीच्या बोटावरचा एक भाग तुटला होता. त्यामुळे प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे मी प्रिस्क्रिप्शनवर लिहून दिले होते. त्याला माझ्याकडे आणताना फस्टएडसुद्धा केले नव्हते.

-डॉ. महेश शिरसाट, नेरळ

माझ्या मुलाच्या बोटाला एवढी मोठी इजा झाली आहे, हे शाळेतून घरी सोडायला आलेल्या शिक्षकांनी सांगण्याची तसदी घेतली नाही. जर दुसर्‍या डॉक्टरांकडे नेऊन तत्काळ उपचार केले नसते, तर जंतुसंसर्ग होऊन माझ्या मुलाचा हात निकामी झाला असता. त्याची जबाबदारी शाळेने घेतली असती का? या शाळेवर कारवाई झालीच पाहिजे. न्यायासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ.

-दिव्या ठक्कर, पालक, नेरळ

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply