Breaking News

स्वावलंबी शिक्षण जीवनातील महत्त्वाचा टप्पा -लोकनेते रामशेठ ठाकूर

सोलापूर : रामप्रहर वृत्त
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योग-व्यवसायातून अर्थाजन केले पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे विद्यार्थिनींनीसुद्धा स्वावलंबी जीवनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच खरी कर्मवीरांना गुरुवंदना ठरेल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या सोलापूर शहरातील सातरस्ता मोदीखाना येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. 10) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात उद्योग व्यवसायामध्ये गुणवत्ता दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. दर्जेदार उत्पादनास मागणी आहे. म्हणून विद्यार्थिनींनी मध्यम व लघु उद्योग व्यवसायातून अर्थाजन केल्यास त्यांचा भविष्यकाळ उज्वल होईल.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या अत्याधुनिक जयकुमारजी पाटील कौशल्य विकास केंद्रात कार्यान्वित असलेल्या ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, फूड प्रोसेसिंग, इंग्लिश स्पिकिंग, संगणकाचे कोर्सेस, योगा सेंटर, कार ड्रायव्हिंग, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, टॅली, शेअर मार्केटिंग, स्पर्धा परीक्षा, बँकिंग परीक्षा या उपक्रमांचे कौतुक केले तसेच यथाशक्ती योगदान दिले जाईल, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाच्या परिसरात मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह साकारण्यात येणार असल्याचे प्राचार्य ढेरे यांनी सांगितले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply