पनवेल : वार्ताहर
बांगलादेशी असूनदेखील मराठी आडनाव लावून अनेक वर्षांपासून पनवेलजवळील चिखले गावात राहणार्या मनोहर पवार या भामट्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. यासंदर्भात त्याची कसून चौकशी केली असता त्याला ग्रामपंचायतीकडून काही शासकीय कागदपत्रे बनवून मिळाली असल्याने पोलिसांनी संबंधित ग्रामसेवक व त्या काळात असलेले सदस्य यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. साधारण 2008च्या दरम्यान बांगलादेश येथून कामधंद्यासाठी बांगलादेशीय इनामुल उमर मुल्ला छुप्या मार्गाने मुंबईत आला. काही वर्षे त्याने मुंबई परिसरात मोलमजुरीची कामे केली. त्यानंतर तो 2011 साली पनवेल तालुक्यातील बेलवली येथे मोलमजुरीच्या कामासाठी आला. या वेळी त्याची पवार या मोलमजुरी करणार्या व्यक्तीशी ओळख झाली व मी एकटा असून मला कोणीही नातेवाईक किंवा घरचे नाहीत, असे त्याने पवार यांना सांगितले व मुन्ना नावाने तो त्या भागात मोलमजुरीची कामे करू लागला. हळूहळू त्याने त्या परिसरातील लोकांचा विश्वास संपादन केला व तो एकटाच असल्याचे पाहून पवारने त्याच्याच माहितीतल्या एका मुलीशी त्याचे लग्न लावून दिले व तो चिखले येथे घरजावई म्हणून राहू लागला.
या वेळी त्याच्या सासर्याचे दुकान तो स्वतः चालवू लागला. तसेच त्याने एक इको गाडीसुद्धा विकत घेतली होती. तोपर्यंत तो बांगलादेशी असल्याचा कोणालाही पत्ता नव्हता व त्याने मनोहर पवार हे मराठी माणसाचे नाव धारण केले, परंतु लग्नानंतर काही महिन्यांतच हा बांगलादेशी असल्याचे त्याच्या पत्नीला समजले होते, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली असल्याने त्यावेळी त्याला मराठी मनोहर पवार हे नाव मिळाले, पण त्या नावाची कोणतीही शासकीय कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. या वेळी त्याने डोेके चालवून पत्नीच्या नावावर असलेल्या कागदपत्रांचा गैरफायदा घेऊन स्वतःची कागदपत्रे बनविली. गावचा जावई असल्याने ग्रामपंचायतीने त्याला आवश्यक असलेली कागदपत्रे बनवून दिली होती. त्यानंतर त्याने त्याच कागदपत्रांचा फायदा घेऊन रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय-अधिवासाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्टपर्यंत त्याची मजल गेली. साधारण दीड महिन्यापूर्वी तो आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांगलादेश येथे गेला व तेथेच 15 दिवस राहिला होता व पुन्हा तो पनवेल येथील चिखले गावात परत आला. दरम्यानच्या काळात आयबीला सदर इसमाचा संशय आला. मराठी नाव असलेला माणूस 15 दिवस बांगलादेश येथे जाऊन एका गावात राहतो व पुन्हा परत येतो. या संशयाच्या आधारे त्यांनी त्याची कागदपत्रे पडताळणी व इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई परिमंडळ 2 येथील अधिकार्यांना याची माहिती दिली. त्याआधारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय खेडकर, हवालदार मंगेश महाडिक, धीरज पाटील, मोकल, चौधरी आदींच्या पथकाने त्याच्या गावात सापळा रचून त्याला उचलले व पोलिसी खाक्या दाखविला. त्यामुळे त्याचा खरा चेहरा बाहेर पडला व मुल्लाचे बिंग फुटले. सध्या त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. असे असले तरी त्याचा तपास अजूनही सुरू असून यासंदर्भात त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सदस्य यांचा पनवेल तालुका पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. हा जबाब पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 येथे कार्यरत असणारे शासकीय वकील यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तीस इतर कागदपत्रे बनवून देण्यासाठी जे एजंट होते, तसेच तहसील व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांचा शोधसुद्धा सुरू असल्याचे समजते.
पोलिसांकडून अद्याप तपास सुरू
गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या विशेष पथकाने या बांगलादेशींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पनवेल परिसरातून जवळपास 70 बांगलादेशींना ताब्यात घेतले असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे बांगलादेशीय वास्तव्यास असून ते प्रामुख्याने लेडीज बार, बीअर बार, मोलमजुरी व घरकाम आदी ठिकाणी काम करताना दिसून येत आहेत. अनेकांनी आपली नावे बदलून घेतली आहेत, तर काही जण कारवाईच्या भीतीने पनवेल सोडून पळाले आहेत. त्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.