Breaking News

पाली भूतीवली धरणात मासेमारी तेजीत; पाटबंधारे खात्याची डोळेझाक

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पाली भूतीवली या लघुपाटबंधारे प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असून ते पाणी गेली अनेक वर्षे धरणात तसेच साठून आहे. त्यामुळे धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात मासे असून, ते जाळे टाकून पकडले जात आहेत. पकडलेल्या माशांची विक्री होत असून, या बेकायदा सुरू असलेल्या व्यवसायाकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत तालुक्यातील आसल आणि उमरोली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पाली भूतीवली या धरणात अनेक वर्षे पाणी साठून आहे. त्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे असून ते पकडण्यासाठी मागील काही दिवसांपासून मासेमारी व्यवसाय करणार्‍यांकडून जाळी टाकण्यात येत आहेत. मासेमारी करणारे सुमारे 50 व्यावसायिक तीन ते चार टेम्पोमधून धरणाच्या जवळ पोहचतात आणि मासे पकडून नेत आहेत. हा व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मासेमारी करणार्‍यांकडे धरणातील मासेमारी करण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी नाही किंवा मासे पकडण्याचे टेंडर देण्यात आले नाही. तरीदेखील पाटबंधारे खात्याच्या या धरणाच्या पाण्यातून दररोज मासेमारी करून त्यांची विक्री केली जात आहे.

धरणातील पाणी कमी झाल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात काही स्थानिक लोक मासेमारी करण्यासाठी जातात. त्यावेळी हेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी स्थानिकांना मासेमारी करू देत नाहीत, मात्र बाहेरून टेम्पो घेऊन येणार्‍या आणि जाळी टाकून मासेमारी करणार्‍यांवर पाटबंधारे विभाग कारवाई करीत नसल्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. धरण परिसराची मालकी असलेल्या पाटबंधारे विभागाकडून त्या ठिकाणी प्रवेश करण्यास मज्जाव असतानाही कोणालाही अडवले जात नाही. धरण परिसरात प्रवेश निषिद्ध, असे फलक पाटबंधारे विभाग व नेरळ पोलिसांनी लावले आहेत, पण त्याचाही काही उपयोग होत नाही. आजूबाजूच्या ग्रामस्थांना तसेच या धरणात जमिनी गेलेल्यांना मे महिन्यात पाणी झाल्यानंतर मासेमारी करायला जाऊ देत नाहीत आणि दिवसाढवळ्या बाहेरचे मासेमारी करणारे व्यावसायिक धरणात जाळी कसे टाकत आहेत, असा प्रश्न आसल, आसलपाडा, भूतीवली, पाली वसाहत, वडवली येथील स्थानिक रहिवाशांना पडला आहे.

आमच्या गावाच्या मागील बाजूने दररोज टेम्पो भरून मासे धरणातून काढून नेले जातात. त्यांना विचारायला पाटबंधारे विभागाला वेळ नाही, मात्र आमच्या एखाद्या ग्रामस्थाने मासे पकडले तर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी लगेच त्या शेतकर्‍याला पकडायला पोहचतात, हे काय आहे? यात पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे साटेलोटे आहे का, असा प्रश्न असून त्याचा तत्काळ छडा लावण्याची गरज आहे.

-अशोक तळपे, ग्रामस्थ, वडवली, ता. कर्जत

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply