Breaking News

बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी लाच

अहमदनगर : प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैद्राबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना आणि शिक्षेस होणार्‍या विलंबाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारले आहे. त्यांच्याच पारनेर तालुक्यात गुरुवारी (दि. 19) हा प्रकार उघडकीस आला. रामचंद्र पांडुरंग वैद्य (मूळ रा. बोधेगाव, ता. शेवगाव) या पोलीस कर्मचार्‍यास 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.

पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली, मात्र त्याला जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात त्याला मदत करण्यासाठी आरोपीच्या नातेवाइकाकडे पोलीस कर्मचारी वैद्य यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली. आरोपीच्या मामाने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नगरच्या पोलिसांनी सापळा रचला. पारनेरमधील एका हॉटेलमध्ये 50 हजार रुपयांची लाच घेताना पोलिसाला पकडण्यात आले. पकडण्यात आलेला पोलीस वैद्य पोलीस निरीक्षकाचा रायटर आणि तपासात मदत करणारा कर्मचारी आहे. त्याआधारे ही लाच स्वीकारून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याचे आणि पुढेही तपासात मदत करून सुटकेचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन त्याने आरोपीच्या मामाला दिले होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply