मुरुड : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. आतापर्यत मुरूड ग्रामीण रूग्णालयात सुमारे दोन हजाराच्यावर नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. मुरूड ग्रामीण रूग्णालयात 7 मार्चपासून 60 वर्षांपुढील आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भीतीपोटी अनेकजण लस घेण्यासाठी येत आहेत. लस घेण्यासाठी प्रथम आधार कार्डची नोंदणी केली जाते, तद्नंतर तपासणी केल्यावर लस दिली जाते. 45 वर्षांच्या पुढील नागरिक लस घेण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात गर्दी करीत आहेत.अशावेळी सामाजिक अंतर पाळले जात नाही. मुरुड शहरातील लेडी कुलसुम बेगम येथे दुसरे लसीकरण केंद्र सुरु केल्यास ग्रामीण रुग्णालयातील गर्दी कमी होईल. त्यामुळे लेडी कुलसुम बेगम येथे लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. लस घेण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेवून मुरूड नगर परिषदे तर्फे ग्रामीण रुग्णालयात मंडप व आसनांची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्याधिकार्यांनी कर्मचार्यांना दिले आहेत. आसन व्यवस्था उपलब्ध झाल्यास सामाजिक अंतरसुद्धा पाळले जाणार आहे.