Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन

स्थानिकांकरिता रक्त सांडवणार्‍या लोकनेत्याचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी

प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी रक्त सांडवले, शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला अशा लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 10) पेणमध्ये केले. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विमानतळ कृती समितीच्या वतीने गुरुवारी ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते. पेणमध्ये आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैकुंठ निवासस्थान ते नगर परिषद चौक नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच तहसील कार्यालय येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. लोकनेते दि. बा. पाटील यांनी संघर्ष करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महाराष्ट्रातील इतर कोणत्याही प्रकल्पाला द्यावे, त्यासाठी आम्ही आग्रही राहू, मात्र नवी मुंबईतील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, असे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी या वेळी सांगितले. या वेळी नायब तहसीलदार प्रमोद जाधव यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. आमदार रविशेठ पाटील, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुध्द पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, वैकुंठ पाटील, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रविकांत म्हात्रे, कोकण कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, नगर परिषद सभापती राजेश म्हात्रे, तेजस्विनी नेने, दर्शन बाफणा, नगरसेवक अजय क्षीरसागर, जे. डी. पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांनी स्वतःचे आयुष्य खर्ची घालून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, ही मागणी कोणत्या राजकीय पक्षाची नसून स्थानिक प्रकल्पग्रस्तांची, शेतकर्‍यांची आहे. राज्य शासनाने स्थानिकांच्या मागणीचा विचार करून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे.

-रविशेठ पाटील, आमदार, पेण

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply