जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन
अलिबाग : जिमाका
राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्ताने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मंगळवारी (दि. 24) राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या अलिबाग आगारातील मोकळ्या जागेमध्ये ग्राहक उपयोगी बाबींचे स्टॉल लावून विविध योजना व वस्तू बाबतची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे दृष्टीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष रविंद्र नगरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी हा त्यांचा हक्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. त्यासाठी ग्राहक चळवळीतील शासकीय व अशासकिय सदस्यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे, असे मत डॉ. सूर्यवंशी यांनी या वेळी व्यक्त केले. पिळवणूक व फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना ती योग्य रितीने तपासून घेणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक हा नेहमी जागरुक असला पाहिजे. ऑनलाईन माध्यमातून होणार्या खरेदीमधून अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायदा हे ग्राहकाच्या झालेल्या फसवणूकीला न्याय मिळवून देण्यासाठीचे व्यासपीठ आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष रविंद्र नगरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी यथोचित माहिती उपस्थितांना दिली. यावेळी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी करुन जिल्हाधिकार्यांनी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिझम सामाजिक संस्थेमार्फत पथनाट्याचे सादरीकरण करुन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार सचिन शेजाळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र रामसिंग राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, एसटीच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सदस्य तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.