अलिबाग : प्रतिनिधी
आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे सोमवारी (दि. 23) जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषद कार्यालयावर मार्चा काढला होता. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखली काढण्यात आलेल्या या मोर्चात सरचिटणीस बृजपाल सिंह, उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, रायगड जिल्हा संघटक रश्मी दिनकर म्हात्रे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नोव्हेबर महिन्याचे मानधन त्वरीत मिळावे, केंद्र सरकारने दिलेली मानधन वाढीची रक्कम मिळावी, अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा, मोबाईल रिचार्रचे पैसे देण्यात यावेत, 2019 सालची भाऊबिजेची रक्कम देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचार्यांना निवृत्तीवेतन देण्यात यावे, रायगड जिल्हा परिषदेने अंगणवाडी कर्मचार्यांना एप्रिल 2014 ची सेवानिवृत्ती रक्कम दिलेली नाही, ती देण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, आदी मागण्यांसाठी हा मार्चा काढण्यात आला होता.