Breaking News

देशातील तरुणाईला अराजकतेविषयी चीड

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सूचक प्रतिपादन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपल्या देशातील तरुण-तरुणींना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड असून, जातीवाद आणि घराणेशाही त्यांना आवडत नाही. योग्य व्यवस्थाच तरुणाईला आवडते व ते अशा व्यवस्थेसोबत असतात, असे सूचक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’ या आपल्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते देशातील जनतेशी रविवारी (दि. 29) संवाद साधत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. त्यानंतर आपण केवळ नव्या वर्षात प्रवेश करणार नाही, तर नव्या दशकात प्रवेश करणार आहोत. या दशकात देशाच्या विकासाला गती देण्यामध्ये त्या लोकांचा सक्रिय सहभाग असणार आहे ज्यांचा जन्म 21व्या शतकात झाला आहे. सध्या देशातील तरुणांना अशी व्यवस्था हवी आहे ज्यामध्ये अराजकता, जातीयवाद आणि घराणेशाही नको. अशीच व्यवस्था त्यांना आवडते आणि याच व्यवस्थेसोबत ते असतात.
स्वामी विवेकानंद म्हणायचे की, तारुण्याची किंमत ठरवली जाऊ शकत नाही. हा जीवनातला सर्वात मौल्यवान कालखंड असतो. या काळात तुम्ही तुमचे आयुष्य कसे जगता त्यावरच तुमचा भविष्यकाळ अवलंबून असतो. त्यामुळे कॉलेजमधल्या स्नेहसंमेलांसारख्या उपक्रमातूनही तुम्ही समाजासाठी मोठे काम करू शकता, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी बिहारच्या पश्चिमगंज जिल्ह्यातील भैरवगंज हेल्थ सेंटरचा या वेळी आवर्जुन उल्लेख केला. या हेल्थ सेंटरमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून जनतेसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय हे काम चालते आणि ते अत्यंत आदर्शवत काम असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोजवळ अ‍ॅस्ट्रोसॅट नावाचे एक अंतराळ उपग्रह आहे. सूर्यावर अभ्यास करण्यासाठी इस्रो आदित्यच्या नावाने आणखी एक उपग्रह लॉन्च करणार आहे. त्यामुळे खगोलशास्त्राबाबत आपले प्राचीन ज्ञान आणि आधुनिक ज्ञान आपल्याला समजण्यास मदत होईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
स्वदेशीचा संकल्प करा!
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला. यासाठी त्यांनी देशवासीयांना विचारले की, 2022 सालापर्यंत स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनामित्त आपण हा संकल्प करू शकतो का? की, या दोन-तीन वर्षांत मी स्थानिक उत्पादने खरेदीसाठीच आग्रही राहणार. भारतात तयार झालेल्या ज्यामध्ये आपल्या देशवासीयांच्या घामाचा गंध असेल अशा वस्तू खरेदी करण्याचा आपण आग्रह करू शकतो का? जम्मू-काश्मीरमधील हिमायत हा कार्यक्रम त्याच्याशीच जोडलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply