खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेषतः खंडाळा घाटात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपघातांची ही मालिका सुरूच असून, रविवारी (दि. 29) दुपारी 12.30च्या सुमारास एक्स्प्रेस वेमार्गे खोपोली बाह्यवळण रस्त्याजवळ एका टेम्पोचा अपघात होऊन आतील तीन कामगार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी आहे.
नागपूरहून नागोठणे येथे लोखंडी जाळ्या घेऊन निघालेला आयशर टेम्पो (एमएच 40 बीजी 6483) मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या खोपोली एक्झिटमधून बाहेर पडत असताना, तीव्र उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि सुरक्षा कठड्याला धडक देऊन टेम्पो दरीच्या दिशेने जाऊन उलटला. या भीषण अपघातात टेम्पोमधील कामगार राम झाजू वाघमारे (वय 35, रा. वादरोशी तिवरे, ता. सुधागड) टेम्पोचालक सतीश अनिल गायकवाड (27, नागपूर) व अन्य एक जण (नाव समजले नाही) असे तिघ जागीच ठार झाले, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली व बोरघाट पोलीस पथकांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. खोपोली अपघातग्रस्त मदत टीम व महामार्गावरील देवदूत टीमसह सामाजिक कार्यकर्त्यांनी मृत व्यक्तींना बाहेर काढणे व जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. यादरम्यान मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …