पनवेल : वार्ताहर
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा (व्ही. के.) विद्यालयाचा शतकपूर्ती सोहळा रविवारी (दि. 29) दिमाखात झाला. या वेळी शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज एका व्यासपीठावर आले, तर माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते.
संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार विवेक पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदींसह नगरसेवक, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.
स्व. आत्माराम महादेव आटवणे यांनी शाळेला दिलेली अडीच एकर जागा आणि दोन इमारती, ज्यामुळे शाळेने 100 वर्षे दिमाखात घालवली याबद्दल त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
शरद पवार म्हणाले की, एखादी शैक्षणिक संस्था उभारणे आणि ती अविरतपणे चालविणे अवघड बाब, तर ती टिकून ठेवणे तारेवरची कसरत आहे. अनेक शिक्षण संस्थांमधून कर्तृत्ववान माणसे तयार झाली असून, यात कोकण एज्युकेशन सोसायटीचाही समावेश आहे. आपल्या भाषणात पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख करून विद्यार्थी घडवून देशाचे भविष्य उभे करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे, असे सांगितले.
मनोहर जोशी यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन राजकीय क्षेत्रातील आपले कितीही मतभेद असले तरी शिक्षणाच्या बाबतीत सगळे एकत्र येतात असे गाव म्हणजे पनवेल असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात संजय पाटील यांनी सांगितले की, सन 1971 साली लोकशाही मार्गाने कोकण एज्युकेशन सोसायटीचा ताबा मिळविल्यानंतर संस्थेची वाटचाल सुरू झाली. 1977 साली संस्थेच्या 24 शाखा होत्या. त्या आज 107 झाल्या आहेत. त्या वेळी 10 हजार इतकी विद्यार्थी असलेली संख्या आज लाखोंच्या पुढे आहे.
या सोहळ्यात शाळेतील आजी माजी शिक्षक, विद्यार्थी, तसेच देणगीदार व योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
Check Also
सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …