Breaking News

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका!

‘सीएए’विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती

लखनौ ः वृत्तसंस्था
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) रस्त्यावर उतरून हिंसाचार करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका, अशी विनंती केली आहे.
जर चांगले रस्ते, सुविधा, सांडपाण्याची योग्य व्यवस्था हा नागरिकांचा हक्क आहे, तर त्यांची योग्य काळजी घेणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौत अटलबिहारी वाजपेयी मेडिकल युनिव्हर्सिटीचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी नागरिकत्व कायद्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारावर भाष्य केले.
आंदोलन करताना हिंसाचार करणार्‍या प्रत्येकाने आणि ज्याने सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे त्यांनी आपण केले ते योग्य होते का, असा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. उत्तर प्रदेशातील तरुण आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदारीकडे लक्ष दिले पाहिजे. आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाकडे वाटचाल करीत असून, आता आपल्यावर जबाबदार्‍या काय आहेत हे ओळखण्याची वेळ आली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
चांगले रस्ते, वाहतूक सेवा आपले हक्क आहेत, पण त्यांची सुरक्षा करणे हेही आपलेच कर्तव्य आहे. दर्जात्मक शिक्षण आपला हक्क आहे, पण शैक्षणिक संस्थांचे रक्षण तसेच शिक्षकांचा आदर हेही आपले कर्तव्य आहे. सुरक्षित वातावरण असणे आपला हक्क आहे, तसेच पोलिसांच्या कामाचा आदर करणे आपले कर्तव्य आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून हिंसाचार करणार्‍यांना सुनावले.
कलम 370, राम मंदिराचा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडवण्यात आला. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना कशा पद्धतीने नागरिकत्व द्यायचे याचा मार्ग मोकळा झाला आहे. 130 कोटी भारतीय नेहमीच अशा आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे गेले आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply